
नागपूर : नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिनव कॉलनी, पंचदीप नगर परिसरात एका घरासमोर पॉलिथिनमध्ये पॅक केलेला मृत भ्रूण आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
अभिनव कॉलनीतील एका घरासमोर संशयास्पद पॉलिथिन पडलेली दिसून आली. नागरिकांनी पाहणी केली असता त्यामध्ये मृत भ्रूण असल्याचे समोर आले. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी न्यायवैद्यक पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने आणि पुरावे संकलित केले आहेत. मृत भ्रूण पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, हा भ्रूण येथे कोणी आणि कोणत्या कारणासाठी आणून टाकला, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात असून संशयित व्यक्ती किंवा वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणामागील नेमके कारण पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.




