Published On : Thu, Jun 29th, 2017

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवा : महापौर

Advertisement
  • महापौर, उपमहापौर, आयुक्त यांनी सतरंजीपुरा व लकडगंज झोनचा केला संयुक्त दौरा
  • नुकसानग्रस्त भागाचे निरीक्षण : नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या


नागपूर : पावसाच्या पाण्यामुळे नागपुरातील अनेक भाग प्रभावित झाले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

मंगळवार २७ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अनेक ठिकाणी नुकसान झाले. सतरंजीपुरा झोनअंतर्गत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल, स्थायी समितीचे माजी सभापती प्रवीण भिसीकर यांनी सतरंजीपुरा झोन भागात संयुक्त दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, नगरसेवक महेश महाजन, नगरसेविका दुर्गा हत्तीठेले, माजी नगरसेवक विलास पराते, गुणवंत झाडे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दहीबाजार उड्डाणपुलासमोरील रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी सरळ उतारभागाने परिसरातील वस्त्यांमध्ये शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे प्रभागाचे नगरसेवक व उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात बऱ्याच ठिकाणी चेंबर फुटले व चेंबरवर कव्हर नाहीत. ते त्वरित दुरुस्त करून कव्हर लावण्याचे निर्देश महापौर व आयुक्तांनी दिले. पावसाचे पाणी कुणाच्या घरात जाणार नाही त्यादृष्टीने पाईपलाईन टाका व पाणी अडणार नाही त्यादृष्टीने त्वरित उपाययोजना करा, असे निर्देश दिले.

झाडे चौक लालगंज शेजारी मनपाच्या बस्तरवारी माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने विद्यार्थांची गैरसोय झाल्याने तेथील चेंबर त्वरित स्वच्छ करा व पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश यावेळी महापौर व आयुक्तांनी दिले. तसेच या परिसरातील आर.डी.पी. अंतर्गत बांधण्यात आलेल्या नाल्यातील गाळ त्वरित काढण्याचे निर्देश दिलेत. या परिसरात कचऱ्याचे ढीग व साफसफाई नियमित करून परिसर स्वच्छ करून औषध फवारणी करा, असेही निर्देशित केले.


लकडगंज झोनमध्ये घेतली आयुक्तांनी आढावा बैठक

यानंतर आयुक्त अश्विन मुदगल व उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी लकडगंज झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांची व झोनअंतर्गत येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. यावेळी आयुक्तांनी संबंधित सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, स्थायी समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, शेषराव गोतमारे, राजकुमार साहू, नगरसेविका सरीता कावरे, मनिषा अतकरे, जयश्री रारोकर, निरंजना पाटील, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता सी.जी. धकाते, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त सुभाष जयदेव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. निगम आयुक्तांनी पाणी साचण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. पहिल्याच पावसात जर या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असेल तर भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसाचे पाणी नाल्यामध्ये सोडण्याची व्यवस्था सदोष असेल तर ती तातडीने दुरुस्त करा. गडर लाईन स्वच्छ करा, असे निर्देशही त्यांनी दिले. पाण्य़ाचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश त्यांनी झोनच्या अधिकाऱ्यांना दिले. लकडगंज झोनमध्ये गडर लाईन लहान असल्याने मोठ्या आकाराची गडर लाईन टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष दखल घेण्यात यावी, अशी सूचना यावेळी आयुक्तांनी केली.

दौऱ्याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिका आपल्या समस्या सोडविण्यासाठी आणि येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहे याबाबत महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना आश्वस्त केले.