नागपूर : शहरात वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटी मिशनने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शहराच्या गर्दीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इतवारी बाजारात राज्यातील पहिले मल्टीलेव्हल रोबोटिक मेकॅनिकल पार्किंग कार्यान्वित करण्यात आले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दोन आणि चारचाकी वाहनधारकांना दिलासा मिळणार असून, पार्किंग व्यवस्थापन अधिक सुटसुटीत होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर-
मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला. नव्या प्रणालीत २५ चारचाकी आणि १५० दुचाकी वाहने उभी करण्याची क्षमता आहे. विशेष बाब म्हणजे वाहनधारकाने गाडी केवळ तळमजल्यावर ठेवायची असून, त्यानंतर रोबोटिक तंत्रज्ञान आपोआप गाडी सुरक्षित स्लॉटमध्ये उभी करणार आहे.
नागरिकांसाठी सोयीसुविधा-
स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे यांनी सांगितले की, पार्किंगचे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यात आले आहे. नियमित वापरकर्त्यांसाठी मासिक पासची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. परिसरात सार्वजनिक शौचालय व कॅफेटेरियाची सुविधाही देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पहिली सुविधा-
दुचाकींसाठी तयार केलेले हे महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक पार्किंग असून, भविष्यात देशातील इतर शहरांसाठीही हे एक आदर्श ठरू शकते. इतवारीसारख्या गर्दीच्या ठिकाणी या उपक्रमामुळे पार्किंगची समस्या सुटेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागपूरकरांना अधिक सुलभ शहरी वाहतूक अनुभवता येईल.