नागपूर : पूर्वी नागरिकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे जावे लागत होते, मात्र आता प्रशासनच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडे येत आहे. लोकाभिमुख प्रशासन आणण्याच्या प्रयत्नामुळे जनतेमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. समाधान शिबीर हे जनतेचे प्रश्न व तक्रारी सोडविण्याचे व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हैद्राबाद हाऊस येथे दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, मिलींद माने, सुधाकर देशमुख, गिरी व्यास, कृष्णा खोपडे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, महापालिकेचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे तसेच नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माहितीचा अधिकार कायद्यानंतर सेवाहक्क हमी कायद्याने नागरिकांना सेवा घेण्याचा हक्क मिळाला आहे. त्यामुळे जनतेची कामे वेळेत पूर्ण होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक कामासाठी कालावधी निश्चित करून दिला आहे. परिणामी 92 टक्के कामे पूर्ण होत आहे. धोरणात्मक निर्णय, न्यायालयीन प्रकरणे आणि आपसी वाद या तीन बाबी वगळता समाधान शिबिरात नागरिकांच्या समस्या दाखल करून घेण्यात येत आहे. मतदारसंघनिहाय नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यात येत आहे. ही कामे मिशन मोडमध्ये पूर्ण करण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.