Published On : Fri, Aug 20th, 2021

मनपाच्या ४७ मृत सफाई कामगारांच्या परिवाराला ‘सोबत’ची साथ

जन्मदिनी संदीप जोशी यांनी स्वीकारले पालकत्व

नागपूर : कोरोनाच्या संकटकाळात जेव्हा सख्ये रक्ताचे लोक जवळ येउ शकत नव्हते अशावेळी आपल्या शहराचे आरोग्य सांभाळण्यासाठी स्वच्छतेचे कार्य करणा-या सफाई कर्मचा-यांनी महत्वाचे कार्य केले. कोरोनामृतदेहांना शववाहिकेतून दहनघाटावर नेणे, त्यांचे अंत्यसंस्कार करणे अशी अनेक कामे या सफाई कर्मचा-यांनी केली. कोरोनाच्या क्रूर काळात काहींना यामध्ये आपला जीवही गमवावा लागला. नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी व अस्थायी स्वरूपात असलेल्या अशा ४७ मृत सफाई कामगारांच्या परिवारावर आलेल्या संकटाची जाण ठेवून माजी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवशी ‘सोबत’च्या माध्यमातून या सर्व ४७ परिवारांचे पालकत्व स्वीकारले आहे. खामला चौकातील रॉयल पराते सभागृहामध्ये संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाद्वारे त्यांनी या परिवारांचे पालकत्व स्वीकारले. या पालकत्वाच्या सेवाभावी कार्यामध्ये अनेकांनी सहकार्य सुद्धा याप्रसंगी दर्शविले. संदीप जोशी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हार, पुष्पगुच्छ न देता अनेकांनी सढळ हातांनी पालकत्वकरिता निधीचे धनादेश सुपूर्द केले.

संदीप जोशी यांच्या ५१व्या वर्षातील पदार्पणानिमित्त दीनदयाल नगर येथील आजी आजोबा पार्क येथे त्यांच्या हस्ते ५१ रोपट्यांचे रोपण करून ५१जणांना प्रत्येकी एका रोपट्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. यासह मेडिकल मधील दीनदयाल थाली परिसर, दत्त मंदिर समाजभवन, न्यू मनीष नगर, चिंचभवन येथेही वृक्षारोपन करून संदीप जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याशिवाय सात ते आठ ठिकाणी आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. लक्ष्मीनगर येथील सिद्ध हनुमान मंदिर व बिरसा मुंडा सभागृह तकीया येथे आरोग्य तपासणी तर रामकृष्णनगर, श्रीराम नगर पावनभूमी, एकात्मता नगर, घाट रोड येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. एकात्मता नगर येथे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्यामार्फत नि:शुल्क चष्मे वितरीतही करण्यात आले. यावेळी पारेंद्र पटले यांनी ‘सोबत पालकत्व’करिता संदीप जोशी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. याशिवाय रामकृष्ण नगर येथे हिमांशू राजेंद्र चौरागडे या विद्यार्थ्याने फेस डिटेक्टर सॉफ्टवेअरच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकाविल्यानंतर मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेतील काही रक्कम ‘सोबत’करिता दिली. दक्षिण-पश्चिम भाजपा आयटी सेल द्वारे डिजिटल माध्यमाने संदीप जोशी यांच्याकडे ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पासाठी निधी जमा केला.

कामगार कॉलनी सुभाषनगर येथे बौद्ध विहाराजवळ तयार होत असलेल्या वैद्यकीय सेवेच्या दवाखान्याचे संदीप जोशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या दवाखान्यामध्ये मनपा व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने आरोग्य सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. मेडिकलमध्ये उभारण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पामध्ये संदीप जोशी यांच्या हस्ते नि:शुल्क भोजन वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. श्रद्धानंद पेठ येथील अनाथालयामध्ये संदीप जोशी यांनी भेट देत येथील अनाथ बालकांना फळे व दैनंदिन जीवनावश्यक साहित्य प्रदान केले. दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना शालेय किटचे वितरण करण्यात आले तर सह्याद्री लॉन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विविध आरोग्य शिबिराप्रमाणेच नागरिकांसाठी आवश्यक शासकीय योजना, पट्टे वाटप आदींबाबतही कार्यक्रम दिवसभरात राबविण्यात आले. नगरसेवक विजय चुटेले यांच्यामार्फत पट्टे वाटप नोंदणी अभियान घेण्यात आले तर रामबाग येथील भुरे मैदानात प्रधानमंत्री जनकल्याण योजना माहिती शिबिर राबविण्यात आले. मनपाचे जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई यांच्यामार्फत शासकीय योजनांच्या माहितीचे शिबिर घेण्यात आले. सुर्वे नगर समाजभवन येथे आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. दत्त मंदिर समाजभवनात संजय गांधी निराधार योजनेच्या माहितीसंबंधी शिबिर घेण्यात आले. नरेंद्रनगर येथे नवीन मतदार नोंदणी स्टॉलचा संदीप जोशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. रामेश्वरीमधील पाठक भवन येथे कोरोना काळात कार्य केलेल्या परिचारीकांचा सत्कार करण्यात आला. प्रतापनगर शाळेमध्येही कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावळी प्रभाग ३७ युवा मोर्चाची कार्यकारीणी घोषित करण्यात आली.

दिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्याची किट प्रदान
लक्ष्मीनगर येथे संदीप जोशी यांच्या निवासस्थानी दिव्यांग क्रीडापटूंना माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते क्रीडा सहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, नागपुरातील आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरूदास राउत प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीची छाप सोडून नागपूर शहराचे नावलौकीक करणा-या दिव्यांग खेळाडूंना स्पोर्ट्स किट प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माजी महापौर संदीप जोशी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू कल्पना सातपुते, मंगला आदमकर, पिंकी तोमर, राष्ट्रीय खेळाडू महफुज आलम व दामोधर घांगरे यांना क्रीडा साहित्याची किट देण्यात आली.

वस्तीतल्या लोकांनी वर्गणीतून घेतला ५१ किलोचा केक
कोरोना काळामध्ये केलेले विविध सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता म्हणून विविध वस्त्यांमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात आले. दंतेश्वरी वस्तीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये उद्भवलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत संदीप जोशी यांच्या मार्फत तब्बल महिनाभरापेक्षा जास्त कालवधीमध्ये दररोज दोन वेळचे भोजन पुरविण्यात आले. या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून या परिसरातील नागरिकांनी स्वत: पैसे जमा करून संदीप जोशी यांच्या वाढदिवसाकरिता ५१ किलोचे केक बोलावून ते संदीप जोशी यांच्या हस्ते कापून वस्तीमध्ये वितरीत करण्यात आले.

गंगा जमना वस्तीमध्ये करणार रक्षाबंधन साजरा
नागपूर शहरातील वारांगणांची वस्ती म्हणून गंगा जमना या वस्तीकडे पाहिले जाते. मागील सुमारे २० दिवसांपासून ही वस्ती पूर्णत: सील करण्यात आलेली आहे. समाजमान्य नसलेल्या व्यवसायामध्ये ढकलल्या गेलेल्या महिलांचे जगण्यासाठी सध्या हाल सुरू आहेत. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी त्यांना आवश्यक ते सर्व अनधान्य व साहित्यांची किट प्रदान करण्यात येणार आहे. २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त या वस्तीमध्ये जाउन येथील महिलांना अन्नधान्याची किट प्रदान करून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करणार असल्याचे संदीप जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर केले.