Published On : Tue, Mar 23rd, 2021

तर निविदा समितीवर कठोर कारवाई करा !

Advertisement

सभापती दिवे यांचे निर्देश : विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई

नागपूर : कोरोनाचा काळ आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सत्र सुरू आहे. मनपाच्या शाळांतील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी तातडीने टॅब देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र १ जानेवारी रोजी निविदा काढूनही केवळ निविदा समितीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी अजूनही टॅबबपासून वंचित आहे. पुढील तीन दिवसांत टॅब उपलब्ध झाला नाही तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून निविदा समितीतील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात मंगळवारी (ता. २३) शिक्षण समितीची बैठक पार पडली. यात ते बोलत होते. यावेळी उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्या संगीता गिऱ्हे, सदस्य मो. इब्राहिम तौफिक अहमद, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांच्यासह दहाही झोनच्या शाळा निरिक्षकांची उपस्थिती होती.

नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे सोयीचे व्हावे यासाठी टॅब देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. टॅब लवकर मिळावे यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया लवकर करण्यात यावे यासाठी शिक्षण समिती आग्रही होती. असे असतानाही या प्रक्रियेसाठी दोनदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. आता सर्व प्रक्रिया झाली असतानाही केवळ निविदा समितीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना टॅब मिळाले नाहीत, असा ठपका सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी ठेवला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता निविदा समिती जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत आहे. केवळ दीड महिना परिक्षेला असताना अद्यापही टॅब उपलब्ध झाला नाही. पुढील तीन दिवसात टॅब उपलब्ध झाले नाहीत तर हा विषय महासभेपुढे ठेवण्यात यावा आणि निविदा समितीतील जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. बैठकीत सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी मनपाच्या शिक्षकांतर्फे ऑनलाईन शिक्षणासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा झोननिहाय आढावा शाळा निरिक्षकांकडून घेतला. ऑनलाईन शिक्षणासोबतच गणवेश वाटपाचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

इंग्रजी शाळांसंदर्भातील प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा!
नागपूर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक अशा सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी मांडला. यासंबंधीची संपूर्ण कार्यवाही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी. येणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून या सहाही शाळा सुरू व्हाव्यात यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशासोबतच स्कूल बॅग आणि वॉटर बॅग देण्याच्या प्रस्तावाला मागील वर्षीच मंजुरी देण्यात आली होती. तशी तरतूदही करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे मागील वर्षी स्कूल बॅग, वॉटर बॅग वितरीत करण्यात आल्या नाही. त्या यावर्षी द्याव्यात, असे निर्देशही सभापतींनी दिले.

‘त्या’ शिक्षिकेला दोन वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव
सुरेंद्रगड हिंदी उच्च माध्यमिक शाळांतील दोन विद्यार्थीनींवर अथक परिश्रम घेत त्यांना आणि पर्यायाने नागपूर मनपाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांचे शिक्षण समितीने अभिनंदन केले. अशा प्रकारचे कार्य सर्व शिक्षकांनी करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दीप्ती बिस्ट यांना दोन वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव आमसभेकडे पाठविण्याचे निर्देश सभापतींनी दिले. पदवीधर शिक्षकांचा प्रश्न बैठकीत चर्चेला आला. पदवीधर शिक्षकांची यादी तयार करून हायस्कूलमध्ये आवश्यक असणाऱ्या विषयानुसार त्यांची ज्येष्ठता पाहून हायस्कूलमध्ये पदोन्नती देण्यात यावी, असा ठराव आमसभेत मांडण्याचे निर्देशही सभापतींनी यावेळी दिले. मनपा, केंद्र शासन आणि एआरटीबीएससी यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात रिसर्च सेंटर तयार करण्यात येत आहे. यासाठी गरोबा मैदान शाळेची जागा निवडण्यात आली असून यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत ठेवण्याचे निर्देशही सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.