Published On : Thu, Jul 19th, 2018

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे

Advertisement

नागपूर: नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्याच्या कामाला नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. गुरूवारी (ता.१९) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, नगरसेविका मंगला गवरे, पराग दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहे. चार हजार पैकी तीन हजार घरे हे पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणार असून एक हजार घरे हे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणार आहेत.

एक हजार घरे हे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड यांच्यावतीने बांधण्यात येणार आहे. याकामाला एकूण २०१ कोटीचा खर्च अपेक्षित असून त्याला संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे. लवकरच या कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी दिली.