Published On : Tue, Sep 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बोरिवली येथे किमोथेरपी केंद्र स्थापनेच्या करारावर स्वाक्षऱ्या

Advertisement

बोरिवली केंद्रामुळे पालघर, डहाणू पर्यंत कर्करुग्णांना दिलासा मिळणार

कर्करुग्णांना निवारा देणाऱ्या नाना पालकर रुग्ण सेवा सदनसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाना पालकर स्मृती समिती आपल्या रुग्ण सेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत व नाममात्र शुल्क घेऊन निवारा, अन्न व औषधोपचार देण्याचे सेवाभावी कार्य निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. मुंबई येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या नाना पालकर स्मृती समितीसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या व त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

Gold Rate
21 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,56,800/-
Gold 22 KT ₹ 1,45,800 /-
Silver/Kg ₹ 3,26,100 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परळ मुंबई येथील नाना पालकर स्मृती समितीच्या पुढाकाराने बोरिवली येथे ‘डे केअर किमोथेरपी’ केंद्र सुरू करण्यासंदर्भात नाना पालकर स्मृती समिती तसेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत आदान-प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ श्रीकांत बडवे, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे व नाना पालकर स्मृती समितीच्या सचिव डॉ. सुमेधा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाना पालकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वेचले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले नाना पालकर रुग्ण सेवा सदन केवळ कर्करुग्णांनाच नाही तर इतर अनेक रुग्णांना तसेच त्यांच्या आप्तेष्टांना मदत करीत आहे असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे देखील कर्करुग्णांच्या उपचाराची सोय आहे. परंतु ‘टाटा’ या नावातच काही जादू आहे, की ज्यामुळे लोक देशभरातून टाटा स्मृती हॉस्पिटल येथे उपचारासाठी येतात असे राज्यपालांनी सांगितले. विज्ञानातील संशोधनामुळे एक दिवस प्रत्येक कर्करुग्ण बरा होईल असा आपणास विश्वास वाटतो असे राज्यपालांनी सांगितले.

“कर्करोग निदान करण्यासाठी लागणार वाढता खर्च चिंताजनक” : डॉ राहुल बाणावली
देशातील लोकांचे सरासरी वय जसे वाढत आहे तसे कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून सन २०३५ पर्यंत देशात दरवर्षी २० लक्ष कर्करुग्णांचे निदान होईल असे सांगताना कर्करुग्णांच्या उपचाराचा सारखा वाढत असलेला खर्च आणि रोगनिदान होईस्तोवर होणारा खर्च चिंताजनक असल्याचे टाटा स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राहुल बाणावली यांनी सांगितले.

टाटा रुणालयात आजही उपचार परवडणाऱ्या किंमतीत होत असल्यामुळे देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी मुंबईत निवाऱ्याची सोय होणे महत्वाचे असते असे सांगून नाना पालकर संस्थेसारख्या किमान दहा सेवाभावी संस्थांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बोरिवली येथे २ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या किमोथेरपी केंद्रामुळे लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा मिळेल तसेच त्यामुळे पश्चिम उपनगरे, विरार, डहाणू, पालघर येथील रुग्णांची सोय होईल असे नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ श्रीकांत बडवे यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव सुमेधा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

सुरुवातीला राज्यपालांनी रुग्ण सेवा सदनाला भेट देऊन तेथील सेवाकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट दिली तसेच निवासी रुग्ण व नातलगांशी संवाद साधला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement