Published On : Wed, Jan 9th, 2019

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

नागपूर- अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

यवतमाळमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याकडे बघितले जात आहे. उद्घाटनापूर्वी हे संमेलन साहित्यिकांमधील वादामुळे गाजत आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून जोशी यांनी आजवरच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. कालच डॉ.जोशी यांनी एक पत्रक काढून अधिवेशन संपेपर्यंत मी कुठल्याही प्रतिक्रियेसाठी आता उपलब्ध नाही. मला अधिवेशन यशस्वी करायचे आहे आणि मी संमेलनाच्या आयोजनामध्ये व्यग्र आहे असे जाहीर केले होते. मात्र आज त्यांनी चक्क राजीनामा दिला.सर्व वादाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जोशी यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
यवतमाळमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते मात्र त्यांनी संमेलनाला उपस्थित राहू नये असे पत्र आयोजकांच्या वतीने चार दिवसांपूर्वी देण्यात आले आणि उभ्या मराठी साहित्य विश्वात खळबळ माजली.हे पत्र डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या सांगण्यावरून नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आले होते असा आरोप स्थानिक आयोजकांनी केला. डॉ.जोशी यांनी मात्र हात वर केले होते.या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या आयोजकांमधील वादही उफाळून आला होता.


नयनतारा सहगल अधिवेशनाच्या उदघाटक म्हणून येणार नसल्यामुळे आता उदघाटन कोणाच्या हस्ते होणार याबाबत उत्सुकता आहे. प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक सुरेश द्वादशीवार ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील यांची नावे महामंडळाकडे आलेली आहेत. त्यातील एलकुंचवार, द्वादशीवार आणि वाघ यांनी उदघाटक म्हणून जाण्यास नकार कळविला असल्याची माहिती आहे.

नयांतरा सहगल यांचे नियोजित संमेलनातील उद्घाटनपर भाषण हे सरकार व व्यवस्थेच्या विरोधात जाणारी असल्यामुळे त्‍यांना उद्घाटनापासून रोखण्यात आले असा आरोप झाल्याने साहित्य संमेलनातील वादाला राजकीय फोडणीदेखील मिळाली आहे.