Published On : Wed, Jul 3rd, 2019

श्री राम सेलिब्रेशन’च्या अनधिकृत सभागृहावर नासुप्र’ची कारवाई

नागपूर: मानेवाडा स्थित लाडीकर लेआऊट नागरिक विकास समिती मधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने उक्त सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ जून दरम्यान याठिकाणी नासुप्र’तर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते. तर उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी आज बुधवार, दिनांक ०३ जुलै रोजी नासुप्र’तर्फे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. सभागृहाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नासुप्र’तर्फे उद्या गुरवार, दिनांक ०४ जुलै रोजी देखील अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे.

इमारतीच्या पूर्वेकडे मंदिर असल्यामुळे या इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. तसेच दक्षिणेकडे भूखंड क्रमांक १८च्या बाजूला राहते घर असल्यामुळे हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता.

इमारतीचा हा भाग श्री. लाडीकर यांना स्वतःतोडून टाकायचे होते. मात्र तसे न करता व नागपूर सुधार प्रन्यासची परवानगी न घेता श्री. लाडीकर यांनी तुटलेला भाग काढून तिथे नव्याने भिंत बांधून पुन्हा अवैध बांधकाम केले.

त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नासुप्र’तर्फे कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी नासुप्र’च्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी श्री. अनिल राठोड, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री संदीप राऊत, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.