Published On : Thu, Jun 8th, 2017

कामातील दिरंगाई भोवली, मनपाच्या पाच आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

NMC Nagpur
नागपूर:  नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक झोनमधील नाला आणि पावसाळी नाल्यांची साफसफाई झाली की नाही यासंदर्भात विहीत वेळेत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या दहापैकी पाच झोनच्या सहायक आयुक्तांना आज (ता. ८) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी ही नोटीस बजावली. पावसाळापूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात बुधवार ७ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यापुढील कामाच्या डेडलाईन ठरवून देण्यात आल्या. या डेडलाईननुसार संबंधित झोनअंतर्गत येणाऱ्या ज्या-ज्या नाल्यांची साफसफाई झाली आहे त्यासंदर्भात ७ जूनला सायंकाळी ५ वाजतापर्यंत महापौर व आयुक्तांपुढे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले होते. या आदेशानुसार केवळ चार झोनमधील अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केले. एका झोनमधील सहायक आयुक्त रजेवर असल्याकारणाने ते प्रमाणपत्र सादर करू शकले नाही.

उर्वरीत पाच झोनमधील सहायक आयुक्तांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त आर.पी. भिवगडे, नेहरूनगर झोनचे राजेश कराडे, लकडगंज झोनचे सुभाष जयदेव आणि मंगळवारी झोनचे हरिश राऊत यांचा यांना ही नोटीस बजावण्यात आली. ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करून आपली एक वेतनवाढ पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता का थांबविण्यात येऊ नये, याबाबत आपण आपले स्पष्टीकरण तीन दिवसाचे आत सादर करावे’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भिवगडेंनी केली दिशाभूल
हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त आर.पी. भिवगडे यांनी दिलेल्या प्रमाणपत्रातून महापौर आणि आयुक्तांची दिशाभूल केल्याचे लक्षात आले. गुरुवारी आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित माहितीच्या आधारे हनुमान नगर झोनमध्ये दौरा केला असता श्री. भिवगडे यांनी सादर केलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे लक्षात आले. ही बाब गंभीर असल्याचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement