नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीज बिल आणि घरखर्चाच्या वादातून पिता-पुत्रामध्ये झालेल्या मारहाणीने गंभीर वळण घेतले. वडिलांनी मुलाचा गळा दाबल्याचा आरोप असून, त्यानंतर संतापलेल्या मुलाने वडिलांच्या पोटात पेचकस खुपसल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
गंगाबाई घाट परिसरातील आकाश बिल्डिंगजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बबलू सहारे हे दारूच्या नशेत होते. वीज बिल भरणे आणि घरखर्चासाठी पैसे न देण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. याचदरम्यान बबलू सहारे आणि त्यांचा मुलगा तुषार यांच्यातही वाद झाला. वाद वाढल्यानंतर बबलू यांनी तुषारसोबत मारहाण करत त्याचा गळा दाबल्याचा आरोप आहे.
यानंतर तुषारने वडिलांसोबत मारहाण करत त्यांच्या पोटात पेचकस खुपसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या बबलू सहारे यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर ममता सहारे यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तुषार सहारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





