नागपूर : शहरात दिवसेंदिवसमहिला अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. यातच नागपुरातील कामठी येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय गतीमंद मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी असलेल्या चोघांनाही अटक केली. मोइन शेख (वय २५), अशोक गभणे (वय ५०), राजू चाचा (वय ५५) आणि नासीर हुसेन शेख (वय ५९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, आरोपी मोईन शेख याची पीडित मुलीशी काही महिन्यापूर्वी भेट झाली. त्यातून दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तो तिच्यावर अत्याचार करू लागला. या प्रकारची माहिती अशोक गभणे याला मिळाली.तो आरोपीला धमकावू लागला. त्यानंतर गभणे याने आपल्या इतर दोन मित्रांसह त्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान वारंवार चौघेही येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यासंर्भात शेजाऱ्यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
नातेवाईकांनी विचारपूस केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाइकाने नवीन कामठी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. त्यांची पाच दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.