
नागपूर — शहरातील तेलंखेडी येथे नामांकित प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ज्युनिअर विद्यार्थ्यानं शाळेतील ९ वीतील काही सिनिअर विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे पालक आणि शाळा प्रशासन दोघांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.पालकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शाळा प्रशासनाला घेराव घातला.
तक्रारीनुसार, काही दिवसांपासून संबंधित सिनिअर विद्यार्थ्यांनी लहान मुलांना धमकावत त्रास देणं, अपमानास्पद कृत्यं करायला लावणं आणि शारीरिक छळ करणं सुरू असल्याचं समोर आलं आहे. पीडित विद्यार्थ्यानं धैर्य एकवटत अखेर ही बाब संबंधित विभागाकडे मांडली.
शाळा प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली असून संबंधित विद्यार्थ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. दरम्यान, पालक संघटनांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे मिलिटरी शाळांमध्ये असलेल्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









