Published On : Sat, Sep 23rd, 2017

शिवसेनेने महागाईविरोधात मुंबईत केले आंदोलन

Advertisement


मुंबई:
शिवसेनेने आज महागाईविरोधात मुंबईत आंदोलन केले. वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईत 12 ठिकाणी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. वांद्रे परिसरातील म्हाडा कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपसोबत सत्तेत सहभागी असूनही सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केले जात असल्याने शिवसेना केंद्र आणि राज्यातल्या सत्तेतून कधी बाहेर पडणार काय? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

शिवसेनेच्या या घोषणांनी केला कहर
मुंबईतल्या वेगवेगळ्या 12 ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. या आंदोलनात ‘नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय’ तर ‘एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनीच ही भाववाढ केल्याने दुर्देवाने आम्हाला या घोषणा कराव्या लागत आहेत.

देसाई, सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
सीएसटी परिसरात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. त्यावेळी मोदी सरकारच्या विरोधात या घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेने महागाईचा प्रतिकात्मक राक्षसही आणला होता. आंदोलनादरम्यान, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालय परिसरात शिवसेनेची महागाईविरोधात निदर्शने केली. यात 150 ते 200 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

शिवसेनेचे आंदोलन नेमके कशासाठी?
देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. भाजीपाला महागला, जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. महागाईला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारबद्दल देशभरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे महागाईचा तीव्र निषेध करत आहोत, असे म्हणत शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली आहे.

काय म्हणाले भाजपचे आमदार आशिष शेलार
‘जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात तो दिर्घायुषी होतो असे म्हणतात.पण नवरात्रीत ‘शिमगा’ करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे!’, अशा शब्दात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.