Published On : Sat, Sep 2nd, 2017

देसाईंना केंद्रात मंत्रिपद दिल्यास शिवसेनेत भडका? शिवसेनेला हवीत आणखी दोन मंत्रिपदे

Advertisement

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा रविवारी विस्तार होणार असून शिवसेनेला एक राज्यमंत्रिपद दिले जाईल, असे सांगितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याचे निश्चित केले आहे. मात्र देसाईंचे नाव चर्चेत अाल्यापासून शिवसेनेच्या अन्य खासदारांमध्ये खदखद व्यक्त हाेत अाहे. राज्यसभेच्या खासदाराला मंत्रिपद देण्याऐवजी लोकसभा सदस्याला मंत्रिपद मिळावे, अशी या नेत्यांची मागणी अाहे. तसेच केंद्रात एक नव्हे, तर दोन मंत्रिपदे मिळावीत अशी मागणीही शिवसेनेने मोदींकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माेदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या अनंत गिते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. दुसऱ्या मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांचीच वर्णी लावली होती. शपथविधीसाठी देसाई दिल्लीला गेलेही हाेते, मात्र भाजपशी बिनसल्यामुळे ठाकरेंनी देसाईंना शपथविधीच्या दिवशी दिल्ली विमानतळावरूनच परत बोलावले होते. मात्र आता केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जदयूचे बिहारमध्ये फक्त १२ खासदार असताना त्यांना दोन मंत्रिपदे दिली जात आहेत, तर आम्हाला तीन मिळावीत, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मंत्रिपदासाठी काही नव्या आणि जुन्या खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग सुरू केले अाहे. याबाबत शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता त्याने आपल्याला काही ठाऊकच नसून उद्धव ठाकरे स्वतःच माहिती देतील, असे स्पष्ट केले.

मागच्या दारातून अालेल्यांनाच महत्त्व
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दुय्यम स्थान अाहे. त्यातही जी मंत्रिपदे पक्षाच्या वाट्याला अाली त्यात विधान परिषदेत असलेल्या vनेत्यांना संधी देण्यात अाली अाणि लाेकांमधून निवडून अालेले अामदार उपेक्षित राहिले, असा शिवसेनेतील एका गटाचा अाराेप अाहे. हा असंताेष उद्धव ठाकरेंच्याही कानी घालण्यात अाला हाेता. अाता तीन वर्षांनंतर केंद्रात दुसरे मंत्रिपद शिवसेनेला मिळण्याची संधी असतानाही लाेकांमधून निवडून अालेल्या खासदाराचा विचार करण्याएेवजी राज्यसभा सदस्य देसाईंचा विचार केला जात असल्यामुळे काही खासदारांमध्ये नाराजी अाहे. त्याएेवजी तरुण खासदाराला संधी मिळावी, अशी मागणी हाेत अाहे.

माेदींच्या निर्णयाकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका करीत शिवसेनेने सरकारमध्ये मात्र वेळाेवेळी भाजपला सहकार्याची भूमिकाच घेतली. त्यांच्या या दुटप्पीपणावर अनेकदा टीकाही झाली. दिल्लीत झालेल्या बैठकीत पुढील निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’साेबतच लढण्यासही उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. त्यामुळे केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे मिळावीत अशी अपेक्षा शिवसेनेला आहे, परंतु अमित शहा आणि नरेंद्र मोदी शिवसेनेला फक्त एक राज्यमंत्रिपदच देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे शनिवारी मोदी यांच्याकडून काय संदेश येतो त्यावर उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत. एक मंत्रिपद मिळाल्यास ते नाकारले जाईल, असेही शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.