नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. राज्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीसारखे दोन मोठे पक्ष फोडले आहेत. त्यामुळे यंदा नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
या अनुषंगाने सकाळ मीडिया ग्रुपने केलेल्या सर्वेनुसार, लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4.9 टक्के मतदान मिळणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12.5 टक्के मतदान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ठाकरेंपेक्षा 7.6 टक्के मतांनी मागे असणार, असा अंदाजही या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला.
जर शिवसेनेच्या 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या मतांची टक्केवारी पाहिली असता, शिवसेनेला त्यावेळेस 23.5 टक्के मते मिळाली होती. मात्र आता पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12.5 टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4.9 टक्के मतदान मिळणार आहे.एकूणच दोन्ही शिवसेनेला मिळून 17.4 टक्के मतदान मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.