मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देत शिंदे सरकारला वाचवत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. यादरम्यान न्यायालयाने उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आले असते , असे म्हटले. यावर आज पुन्हा माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपले मत मांडले.
सर्वोच्च न्यायालयाने निकालात असं निरिक्षण नोंदवले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आले असते . मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ आत्ताचं अस्तित्वात असलेलं शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला. मात्र, मी माझ्या निर्णयावर आजही समाधानी आहे. मी माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला असल्याचे ते म्हणाले.
ज्या लोकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मी सर्वकाही दिल्यानंतरही त्यांनी माझा विश्वासघात केला हे मला पटले नाही. अशा विश्वासघातक्यांचे प्रमाणपत्र घेऊन मला मुख्यमंत्री राहायचे नव्हते म्हणून मी राजीनामा दिल्याचे ठाकरे म्हणाले.