Published On : Fri, Jan 24th, 2020

ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून – शरद पवार

Advertisement

– सामाजिक न्याय विभागाची बैठक पार

मुंबई: -समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपणाला जागरूक रहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपणाला करायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

केंद्रसरकारचे आज समाजातील मागासलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत असा आरोपही शरद पवार यांनी केला.

आज तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आपल्या पक्षाने लहान घटकांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, सुविधा, महिला सुरक्षा अशा सर्व गोष्टीत बळकटी मिळण्याचा प्रयत्न यातून होईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

मागील सरकारच्या काळात मागासवर्गियांना अतिशय दुय्यम वागणूक दिली गेली . अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आज राज्याच्या मंत्रीमंडळात सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर आहे. धनंजय मुंडे हे चांगले संघटक आहेत त्यामुळे ते समाजातील सर्वच घटकांना न्याय देतील असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपण संघटना म्हणून सर्वांना जोडण्याची भूमिका घ्यावी. सामाजिक न्याय विभागाच्या योजना इथल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. सामाजिक न्याय विभागाने समाजातील प्रत्येक घटकाला राष्ट्रवादीशी जोडण्याचे काम करावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थितांना केले.

विधानसभेचा निकाल लागल्यावर कोणालाही हे तीन पक्षांचे सरकार येईल, असे वाटले नसेल पण हे काम आदरणीय पवार साहेबांनी साध्य केले. त्यात सरकार आल्यावर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला व त्याची जबाबदारी माझ्यावर दिली याबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पवारसाहेबांचे आभार मानले.

या विभागातून नेमके किती आणि काय काम करू शकतो याचा अंदाज मागील १५ दिवसात आला आहे. राज्यातील २२.५ टक्के लोकांशी थेट संबंध येतोय हे माझे भाग्य आहे. हे फार मोठं आव्हान आहे आणि यासाठी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या नेतृत्वाची दूरदृष्टी किती आहे ते पहा. जसा काळ बदलतो तसे निर्णय घेण्याची गरज असते. यासाठी पवारसाहेबांनी आदेश दिले आहेत की, इथून पुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल तसेच राज्यात अशी नावे असलेल्या वस्त्या असल्यास ती नावे बदलून योग्य नावे देण्याचे काम पूर्ण होईल असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

वंचितातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी अनेक बदल करण्याची गरज आहे. यातून काही घटकांची मनं दुखावली जातील पण हे बदल होणे गरजेचे आहेत. आणि ते होणारच अशी स्पष्ट खात्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

१४ एप्रिल २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापुढे साजरी केली जाईल याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे हे माझे थोर भाग्य आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त केले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख डॉ. जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.