नवी दिल्ली:केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाला शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यासंदर्भात आज कोर्टात मंगळवारी (19 मार्च )सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्यास मुभा देऊ नये अशी मागणी शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. यावर न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला दिलेली तुतारी हे चिन्ह राज्यसभा निवडणुकीपर्यंत वापरण्यास सांगितले होते. आता हे चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरण्यास मुभा दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नोंदणीकृत पक्ष म्हणून गृहित धरायचे आहे. तसेच त्या पक्षाला देण्यात आलेले तुतारी हे चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला देऊ नये असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच अजित पवार यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही वृत्तपत्रांमध्ये एक नोटीस द्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आमच्याकडे आहे.
शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद कतराना म्हटलं की, घड्याळ हे चिन्ह म्हणजे शरद पवारांचे असं ग्रामीण भागातील लोकांना वाटतं. त्यावर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला वर्तमानपत्रात नोटीस देऊन सांगा की, घड्याळ हे चिन्ह आपल्याकडे आहे.