Published On : Thu, Mar 29th, 2018

चहा घोटाळा: मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं – पवार

Advertisement


पुणे: मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं.मी मुख्यमंत्री असताना चहापानाला इतका खर्च येतो हे जाणवलं नाही अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानाच्या खर्चाबाबत सुरु असलेल्या वादावर पवार यांनी हि टिपण्णी केली आहे.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचा आरोप ताजा असतानाच एक नवीन आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता.

संजय निरुपम यांचा आरोप-
मुख्यमंत्री कार्यालयात अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाला आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर ५७ लाख ९९ हजार १५६ रुपये खर्च झाला होता. तो खर्च२०१६-१७ मध्ये एक कोटी २० लाख ९२ हजार ९७२ रुपयांवर पोहचला.२०१७-१८ या वर्षात चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराचा आधार घेत काढलेला निष्कर्ष पूर्णत: चुकीचा असल्याचा दावा सीएमओने केला आहे.हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे. यात वर्षनिहाय देयक दिल्याचा आकडा असून ते एकाच वर्षाचे दिले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही सीएमओकडून सांगण्यात आलं.