Published On : Fri, Nov 15th, 2019

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

Advertisement

नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून, आजचा दुसरा दिवस आहे. अतिवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. शेतकऱ्यांच्या पिकांचं अभूतपूर्व नुकसान झालं आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी जास्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असून, केंद्राकडून शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल, असं त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज्यात तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे पुन्हा आपलेच सरकार येईल. हे सरकार स्थापन झालेच तरी, सहा महिने टिकणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हतं,’ अशी कोपरखळीही त्यांनी मारली.