
नागपूर : सत्र न्यायालयाने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पी. आर. पाटील यांना लैंगिक छळ प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, सरकारला नोटीस बजावून यावर २० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
गत ४ डिसेंबर रोजी सदर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. त्यावेळी पाटील नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) होते. या प्रकरणामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पीडित महिला एसीबी कार्यालयात कर्तव्यावर आहे.
तक्रारीनुसार, पाटील यांनी विविध बहाण्याने महिलेशी सलगी साधण्याचे प्रयत्न केले. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पाटील यांनी तिचा छळ सुरू केला. परिणामी, महिलेने वरिष्ठांकडे तक्रार केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आले. परिणामी, पाटील यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. न्यायालयात पाटील यांच्यातर्फे अॅड. मुकेश शुक्ला तर, सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.