नागपूर : स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या छाप्यात स्पा संचालकाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान चार महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना पैशांचे आमिष देऊन या व्यवसायात ढकलण्यात आले होते.
क्राइम ब्रँचच्या या छाप्यात पकडलेला आरोपी नवीन भगवान सिंग हा अमर नगर, सोनेगाव येथील रहिवासी आहे. तर त्याची साथीदार असलेली श्रुती सिंग नावाची महिला अद्यापही फरार आहे.
आरोपीचे सोमलवाडा चौकात गंगा स्पा सेंटर आहे. स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या स्पा सेंटरवर छापा टाकला. टनास्थळी पोलिसांना आरोपी नवीन हा पीडित मुलींना वेश्याव्यवसायात भाग पाडत असल्याचे आढळून आले. त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून चार पीडितांची सुटकाही करण्यात आली.
चौकशीत आरोपी गेल्या दीड वर्षांपासून हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. आरोपी नवीन व श्रुती यांच्याविरुद्ध सोनेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.