नागपूर : नुकतेच शिंदे आणि भाजप सरकारमध्ये अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत सामील झाले. त्यामुळे सरकारमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने मंत्रिपदाची संधी मिळणार की नाही म्हणून अनेक जण दु:खी असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील सुरेश भट सभागृहात विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
शिंदे गट आणि भाजपच्या युती सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यापार्श्वभूमीवर गडकरी यांनी आपले मत मांडले. आधीपासूनच सगळे नवीन ‘कोट’ शिवून बसले होते. केव्हा बोलावणे येणे आणि केव्हा जातो. मात्र, आता या कोटचे काय करायचे हा प्रश्न आहे. एखाद्या सभागृहाची बैठक क्षमता वाढवता येईल. मात्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या वाढवता येत नाही, असा टोला लगावत गडकरी यांनी भाजप -शिंदे सरकारला घरचा आहेर दिला.
आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मिळाले असे वाटणे म्हणजे समाधान आहे. सध्या नगरसेवक याकरिता दु:खी आहेत की, ते आमदार झाले नाही. आमदार याकरिता दु:खी आहेत की ते मंत्री झाले नाही. मंत्री याकरिता दु:खी आहेत की चांगले खाते मिळाले नाही. आणि आता जे होणार होते ते याकरिता दु:खी आहेत की आता आपल्याला संधी मिळणार की नाही. कारण सरकारमध्ये अनेक जण मोठ्या संख्येने सामील झाले असून प्रत्येकाला संधीची अपेक्षा आहे.