Published On : Thu, Mar 5th, 2020

शिवकृष्ण धाम येथे प्रत्येक घरी मिळणार स्वतंत्र नळ जोडणी

अमृत योजनेंतर्गत जलवाहिनीचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर : प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत कोराडी मार्गावरील शिवकृष्ण धाममध्ये अमृत योजने अंतर्गत टाकण्यात येणा-या जलवाहिनीच्या कामाचे बुधवारी (ता.४) मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

शिवकृष्ण धाम येथे स्वतंत्र नळ जोडणी नसल्यामुळे परिसरात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नव्‍हता. मुबलक पाण्याकरीता नागरिकांना २४ तास नळ सुरू ठेवावे लागायचे. परिणामी पाणी बिलही मोठे यायचे. यासंदर्भात परिसरातील रहिवाशांकडून सत्तापक्ष नेते व स्थानिक नगरसेवक संदीप जाधव, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर यांना अनेकदा निवेदन देण्यात आली. यावर गांभीर्याने दखल घेत व वारंवार पाठपुरावा करून सत्तापक्ष नेते संदीप जाधव व महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे यांच्या प्रयत्नातून परिसरात अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.


अमृत योजनेकरिता मनपाला २६८ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. मनपा पदाधिकारी व प्रशासनाने संयुक्त पुढाकार घेउन शिवकृष्ण धामचा सदर योजनेमध्ये समावेश करून जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शिवकृष्ण धाम परिसरामध्ये आसीनगर झोनमधून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात बुधवार (ता.४)पासूनच जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. येथे सुमारे २ किलोमीटरची ४ व ६ इंचची जलवाहिनी टाकण्यात येईल. या कार्याला जवळपास १ महिन्याचा कालावधी लागेल. या नवीन जलवाहिनीमुळे परिसरातील ४०० घरांना दिलासा मिळणार आहे.

जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवकृष्ण धाममधील प्रत्येक घराला स्वतंत्र नळ कनेक्शन करिता अर्ज करावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर त्यांना झोनमार्फत डिमांड दिले जाईल. डिमांड भरणा-यांना त्वरीत नळ जोडणी देण्यात येईल, अशी माहिती आसीनगर झोनचे जलप्रदाय विभागाचे शाखा अभियंता रत्नाकर पंचभाई यांनी दिली.