Published On : Sat, Apr 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळजनक घटना; बेपत्ता मुलाचा बोऱ्यात मृतदेह, हात-पाय बांधलेले

Advertisement

नागपूर : शहरातील गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व दिलीप नैनोरे या मुलाचा मृतदेह कलमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका बोऱ्यात आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत विचित्र व विद्रूप असल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जन्मोत्सवानिमित्त गिट्टीखदान परिसरात आयोजित मिरवणुकीत अथर्व सहभागी झाला होता. सायंकाळी सुरू झालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र मिरवणूक संपल्यानंतर अथर्व अचानक बेपत्ता झाला. घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली, पण काहीच सुगावा लागला नाही. अखेर शुक्रवारी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, शनिवारी मुलाचा मृतदेह भरतवाडा परिसरात सापडताच संतापाची लाट उसळली. नागरिक आणि नातेवाईकांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यावर धडक देत जोरदार आंदोलन केले. इतका वेळ उलटूनही पोलिसांकडून ठोस तपास न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिक आणि पोलिसांमध्ये काही काळ वादावादीही झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.