Published On : Tue, Nov 9th, 2021

ज्येष्ठांनी सोशल मिडियाचा अधिक वापर टाळावा : सायबरतज्ज्ञ अजित पारसे, सायबर सतर्कतेवर मार्गदर्शन.

सुयोगनगर : सोशल मिडियाबाबत मार्गदर्शन करताना सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे, शेजारी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरसेविका विशाखा मोहोड.

नागपूर: प्रत्येक व्यक्ती सोशल मिडियाचा वापर करीत आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मिडियाचा अधिक वापर टाळावा, असा सल्ला सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी दिला. पेंशनधारक तसेच आर्थिकदृष्ट्या सबळ ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी नागरिकांची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी विचार करावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

नुकताच सुयोगनगर येथील महात्मा फुले उद्यान सभागृहात साई सावली वृद्धाश्रमतर्फे ‘सोशल मिडियाचा वापर तसेच सायबर सतर्कता’ यावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. शिबिराचे उद्‍घाटन माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यावेळी पारसे बोलत होते. व्यासपीठावर नगरसेविका विशाखा मोहोड, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र आंभोरे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणाईला मार्गदर्शन करताना पारसे म्हणाले, सोशल मिडिया दुधारी तलवार आहे. त्याचा योग्य वापर निश्चितच फायद्याचा आहे. परंतु अलिकडे सायबर गुन्हेगार सक्रीय झाले असून ते ‘टारगेट’ शोधत असतात. यात महिला तसेच ज्येष्ठ नागरिक बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहे.

त्यामुळे कुणाशीही संवाद करताना, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावध राहण्याची गरज आहे. घरातील फोटो, बाहेर गेल्याचे फोटो टाकणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी पारसे यांनी ‘वेब नागपूर’ या संकेतस्थळाबाबत माहिती दिली. या संकेतस्थळावर शासकीय विविध लिंक तसेच मोबाईल, विज बिल भरता येते व महापालिकेसंबंधी तक्रारही करणे शक्य असून नागरिकांनी जास्त जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मिडियाबाबत समाजात जनजागृती करीत असल्याबाबत अजित पारसे यांचे कौतुक केले.

अशाप्रकारे अनेक निःशुल्क शिबिरे घेण्याची सूचनाही त्यांनी पारसे यांंना केली. यावेळी मामा पांढरीपांडे, जगदीश कावळे, पत्तीवार, अतुल सोनटक्के, आभा खटी, आनंद बारापात्रे, आसावरी कोठीवान, लक्ष्मी गवई, छाया पाराशर, छबु तुपे, सुनीता शिंदे आदी उपस्थित होत्या.