Published On : Wed, Nov 23rd, 2022

स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेने स्वीकारली ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी

Advertisement

पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियान : पोषण आहार किट वितरीत

नागपूर : पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानात हातभार लावत क्षयरोग (टी.बी.) बाधितांच्या आहारासाठी सहकार्य करण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरातील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेद्वारे ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून या रुग्णांना पोषण आहार किटचे वितरीत करण्यात येत आहे. सलग दुस-या महिन्यात संस्थेच्यावतीने माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी व डॉ. कडू यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत करण्यात आली.

याप्रसंगी या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, प्रमुख श्री. अनिल मानापूरे, श्री. कमलेश नायक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्ण अर्थात टी.बी. रुग्णांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक असलेले दैनंदिन पोषण आहार देण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील स्वयंसेवी संस्थांद्वारे उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यात स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेनेही सहकार्य दर्शविले व ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी स्वीकारली. सलग सहा महिने पोषण आहार किट वितरीत करण्याचा संस्थेचा मानस असून दोन महिन्यांच्या किट वितरीत करण्यात आलेल्या आहेत. शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर आदी पोषक घटकांचा समावेश असलेली किट क्षयरुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे.

किट वितरणासाठी स्व. प्रभाकरराव दटके स्मृती महाल रोगनिदान केंद्रातील क्षयरोग विभाग प्रमुख नेहा सोनटक्के, मनीषा कांबळे, योगिता सुरखडे आदींनी सहकार्य केले.