Published On : Mon, May 3rd, 2021

‘सेल्फ मॉनिटरींग’, नियमित औषधोपचार मधुमेह व दमा रुग्णांना कोरोनापासून दूर ठेवण्यास सहायक

Advertisement

कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये मधुमेह आणि दमा असलेले रुग्ण अतिशय धोकादायक गटामध्ये मोडतात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये भीतीही जास्त आहे. मधुमेह आणि दमा असलेल्या रुग्णांना कोरोना झाल्यास तो गंभीर स्वरूपात होण्याची शक्यताही जास्त असते. मात्र ही भीती मनात न बाळगता आपले नियमित औषधोपचार सुरू ठेवावे. याशिवाय स्वत:च स्वत:चे नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी मधुमेह असलेल्या रुग्णांनी ऑक्सिमीटरप्रमाणेच घरात ग्लूको मीटर ठेवावे तर दमा असलेल्यांनी पीएफआर मीटर ठेवावे. दोन्ही रुग्णांनी नियमित तपासणी करून त्याची माहिती आपल्या डॉक्टरांना द्यावी अथवा टेलीकौसिलींगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यानुसार औषधांचे सेवन करावे. आजच्या या संकटात ‘सेल्फ मॉनिटरींग’ आणि नियमित औषधांचे सेवन हे गंभीर स्वरूपाच्या कोरोनापासून मधुमेह व दमा असलेल्या रुग्णांच्या बचावाचे मोठे शस्त्र आहे, असा सल्ला प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ.अजय कडुस्कर आणि प्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ.समीर अरबट यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.३) डॉ.अजय कडुस्कर आणि डॉ.समीर अरबट यांनी ‘कोव्हिड – मधुमेह आणि दमा’ या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

मधुमेह आणि दमा असलेल्या रुग्णांसाठी सध्याचा काळ खूप जास्त काळजी घेण्याचा आहे. मात्र काळजीपोटी भीतीच मनात घालणे हे सुद्धा योग्य नाही. मधुमेहग्रस्तांनी ग्लूको मीटरद्वारे नियमित शुगरमधील चढउतार तपासावे त्यात अनियमितता दिसून आल्यास तात्काळ प्रत्यक्ष भेटून किंवा टेलीकौसिलींगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेउन आपले औषध नियमित घ्यावे. याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे सकस आहार आणि घरच्या घरी करता येईल असे व्यायाम. मधुमेह नियंत्रणासाठी आहार आणि व्यायामाचा मोठा फायदा होतो.

याशिवाय कोव्हिड हा इतर अवयवांच्या तुलनेत फुफ्फुसावर लवकर प्रभाव करीत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोव्हिडमुळे होणा-या मृत्यूमध्ये दुस-या क्रमांकार फुफ्फुसाशी संबंधित आजार असलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे दमा, अस्थमा असणा-यांना धोका आहे पण काळजी घेतल्यास भीती मात्र नाही. आपले फुफ्फुस आणि त्वचा हे वातावरणाशी थेट संपर्क येणारे अवयव आहे. उन, वारा, पाउस, थंडी व इतर अन्य बदलाचा थेट सामना त्वचेला करावा लागतो. तर आपण जो श्वास घेतो तो थेट फुफ्फुसाशी संपर्कात येतो. दमा असलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांना जास्त सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आज कोव्हिडपासून बचावाचे सर्वात रामबाण उपाय म्हणजे मास्क आहे. कापडी, एन९५, फेसशिल्ड हे सर्व सारखेच प्रभावशाली आहेत. त्यामुळे सर्वांनीच घराबाहेर पडताना, कामावर जाताना आपल्या सोयीनुसार जे सोयीस्कर होईल ते मास्क लावणे आवश्यक आहे, असाही सल्ला डॉ.अजय कडुस्कर आणि डॉ.समीर अरबट यांनी दिला.

आज लस हा मोठा दिलासा आपल्यासर्वांसाठी आहे. लस घेतल्याने ७० ते ८० टक्के कोव्हिडचा धोका कमी होतो. कोरोना झाल्यास त्याचे स्वरूप गंभीर राहत नाही. लस घेतल्याने आपले रक्षण होतेच शिवाय आपल्या आजुबाजुच्या लोकांसाठी सुरक्षा निर्माण होते. लसीसंदर्भात व्हॉट्सॲप व अन्य समाजमाध्यमावर फिरणारे संदेश केवळ भ्रामक आहेत. त्याकडे लक्ष न देता लस घेण्यासाठी पुढे या. मधुमेह व दमा असलेल्यांनी आवर्जून लस घ्या. लस घेताना किंवा घेतल्यानंतर औषधे बंद करू नका, असाही मौलीक सल्ला डॉ.अजय कडुस्कर आणि डॉ.समीर अरबट यांनी यावेळी दिला.

लस घेण्यापूर्वी रक्तदान करा : डॉ. संजय देवतळे
कोरोनाच्या या महामारीमुळे वर्षभराहून अधिक कालावधीपासून जनजीवन विस्कळीत झाले. त्याचा प्रभाव रक्तपेढ्यांवरही पडला. आजच्या स्थितीत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. कोरोनाविरहीत अन्य उपचार, शस्त्रक्रिया आदीसाठी रक्ताची नितांत गरज पडते. सध्या रक्तदान शिबिरही नसल्याने रक्त पुरवठाच होत नाही. शासनाद्वारे १८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. रक्तदानासाठी १८ ते ४५ हा वयोगट सर्वोत्तम दाता मानला जातो. त्यामुळे तरुणांनो लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, असे आवाहन आयएमए चे अध्यक्ष डॉ.संजय देवतळे यांनी केले आहे.