स्वनिधी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
नागपूर : प्रधानमंत्री श्री. नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी लागू करण्यात आलेली ही योजना गोरगरीब पथविक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी काढले. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत स्वनिधी महोत्सवाचे नागपूर महानगरपालिकेद्वारे यशस्वी आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत त्यांनी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि मनपाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अभिनंदन केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनाच्या उद्देशाने शुक्रवारी २९ जुलै २०२२ रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्वनिधी महोत्सवाचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
मंचावर आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, श्री. राम जोशी, गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे नॅशनल मिशन मॅनेजर श्री. विजय सिंह, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त श्री. विजय हुमने, समाज विकास अधिकारी डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त श्री. हरीश राऊत, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, क्रीडा अधिकारी श्री. पीयूष आंबूलकर, पथविक्रेता संघटनेचे शिरीष फुलझेले, नंदकिशोर शर्मा, विनोद तायवाडे, रज्जाक कुरेशी, कविता धुर्वे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून जवळपास २० हजार लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांचे मोठे योगदान आहे. गरिबांना कर्ज मिळण्यास अनेक अडचणी येतात. पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयची संकल्पना मांडली. गरीबाला परमेश्वर मानून शेवटापर्यंत सेवा करायची, त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन आज महत्वाचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे केले जात आहे, ही आनंददायी बाब आहे, असे सांगत त्यांनी मनपाचे अभिनंदन केले.
पथविक्रेत्यांनी विश्वसनीयता जपत कर्जाची वेळेवर परतफेड करून पुढे आणखी कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढीस न्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकमध्ये मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी योजनेबददल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्वानिधी योजना सक्षमपणे राबिण्यासाठी नागपूरचा समावेश देशाच्या पहिल्या पाच शहरामधे करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ मोठ्या संख्येने पथ विक्रेते यांना मिळाला आहे.
पथ विक्रेत्यांच्या कुटुंबाकरिता व स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांकरिता विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वनिधी महोत्सवांतर्गत भजन, गायन, नृत्य, मिमिक्री, नाट्य, वादन, कुकिंग आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आले होते. यासाठी मनपाद्वारे व्हिडिओ स्वरूपात सादरीकरण मागविण्यात आले होते. यापैकी उत्कृष्ट गायन, नाट्य, वादन चे कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले.
नृत्य, गायन आणि कुकिंग स्पर्धेतील पहिल्या दोन विजेत्यांना प्रथम पुरस्कार ३००० रुपये आणि द्वितीय पुरस्कार २००० रुपये प्रदान करण्यात आले. याशिवाय पथविक्रेत्यांच्या गुणवंत मुलांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वनिधी महोत्सव आणि पथविक्रेत्यांच्या विविध योजनांबाबत तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले होते.
शहरी उपजीविका केंद्राअंतर्गत बचत गटाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले. पथविक्रेत्यांकडून यावेळी सादर करण्यात आलेल्या गोंडी नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज विकास विभागाचे व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नुतन मोरे, प्रमोद खोब्रागडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अँकर अंकिता मोरे यांनी केले तर आभार उपायुक्त श्री. विजय हुमने यांनी मानले.