Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Oct 15th, 2019

  काँग्रेसची जमानत जप्त करा : नितीन गडकरी

  मौदा येथे भव्य जाहीरसभा, भरउन्हात नागरिकांची उपस्थिती

  नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार टेकचंद सावकर यांचे मी आणि बावनकुळे दोघे गॅरंटर आहोत. सावरकर जरी उमेदवार असले तरी पालकमंत्री बावनकुळे याच मतदारसंघात काम करणार आहेत. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आतापर्यंत त्यांनी सोडवले. आताही तेच सोडवणार आहे. मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणूनच काँग्रेसची जमानत जप्त करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  भाजपाचे कामठी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या प्रचारार्थ मौदा येथील जाहीरसभेला गडकरी संबोधित करीत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, नगराध्यक्ष भारती सोमनाथे, टेकचंद सावरकर, निशा सावरकर, नरेश मोटघरे, योगेश वाडीभस्मे, अनिल निधान, देवेंद्र गोडबोले, मुन्ना चलसानी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

  याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, मौद्यासोबत जिल्ह्याचा विकासही गतीने होतो आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी येथील जनतेचे प्रश्न यशस्वीपणे सोडविले आहेत. मी पूर्वी येथे येत होतो, तो काळ पक्षाचा कठीण काळ होता. निवडणुका लढवीत होतो, पण यश मिळत नव्हते, असा तो काळ होता. त्या काळातही बावनकुळे आणि सावरकर यांनी पक्षासाठ़ी मोठे काम केले. जिल्ह्यात भाजपाचे संघटन वाढविण्यात पालकमंत्री बावनकुळे यांचे उल्लेखनीय योगदान आहे. कधीही गटबाजीचे राजकारण आम्ही केले नाही. एका परिवाराच्या भूमिकेत आम्ही वागलो. जनतेने आम्हाला जमिनीवरून आकाशाकडे नेले आहे, असेही ते म्हणाले.

  नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे भविष्यात आम्ही डिझेलमुक्त करणार आहोत, असे सांगाताना नितीन गडकरी म्हणाले- वीज निर्मिती केंद्रांना सांडपाणी शुध्द करून देण्यात येत आह. त्यामुळे आतापर्यंत देण्यात येणारे 180 एमएलडी स्वच्छ पाणी आता या भागातील शेतकर्‍यांच्या कामात येणार आहे. या मतदारसंघातील 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल असे प्रकल्प येणार आहेत. लोहार, सुतार, चांभार सर्वांना कामे मिळून, शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून सुजलाम् सुफलाम् करण्याचा या शासनाचा उद्देश आहे. यासाठी योग्य उमेदवाराची निवड म्हणजे भाजपा शिवसेना महायुतीच्या सावरकरांची निवड करून त्यांच्या नावासमोरील कमळ चिन्हाची बटन दाबून त्यांना अधिकाधिक मताधिेक्याने विजयी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या विकासासाठी 1 लाख कोटींपेक्षा जास्त निधी नितीन गडकरी यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा मजबूत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मी पाच वर्षांपासून काम करीत आहे. 25 वर्षात जी कामे झाली नाही, तेवढी कामे विद्यमान भाजपा शासनाने 5 वर्षात केली आहेत, याकडेही पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

  अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे याप्रसंगी म्हणाल्या- भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष राहिला नाही. बहुजन समाजाचे व आंबेडकरी जनतेच्या समस्या आणि प्रश्न या पक्षाने प्राधान्याने सोडवल्या आहेत. इंदुमिलची जागा, दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस-चिचोली या स्थानांचा विकास, लंडनमधील डॉ. आंबेडकरांचे निवासस्थान भाजपाच्या काळातच ही कामे झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी 70 वर्षात हे प्रश्न सोडवू शकले नाहीत. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यास काँग्रेसला 12 वर्षे लागली. 28 जणांना शहीद व्हावे लागले, याकडेही सुलखाताई कुंभारे यांनी लक्ष वेधले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145