Published On : Mon, Jan 27th, 2020

विज्ञान प्रदर्शनामुळे बाल वैज्ञानिकांच्या मुक्त संकल्पना साकारण्यास मदत : प्रा.दिलीप दिवे

Advertisement

‘यंग कलाम सायन्स फेस्टिव्हल’चे उद्घाटन : विविध प्रयोगांमध्ये विद्यार्थी रममान

नागपूर : विज्ञान हा रोजच्या व्यवहारातून शिकण्याचा विषय आहे. एखाद्या गोष्टीतील कुतुहल, त्याबद्दलची जिज्ञासा विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला जन्म देते. प्रयोगशीलतेमुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातील मुक्त संकल्पनांना वाव मिळतो. विज्ञान प्रदर्शनामुळे बाल वैज्ञानिकांच्या या मुक्त संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व एचसीएल फाउंडेशनच्या सहकार्याने रामदासपेठ येथील बॅरीस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन येथे २७ व २८ जानेवारीला आयोजित दोन दिवसीय ‘यंग सायन्स फेस्टिव्हल’चे सोमवारी (ता.२७) शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मंचावर आमदार नागो गाणार, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, मनपा शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, मेयर इनोव्हेशन कौंसिलचे कन्वेनर डॉ.प्रशांत कडू, एचसीएल फाउंडेशनच्या शिक्षण उपव्यवस्थापक नम्रता सिन्हा आदी उपस्थित होते.

फीत कापून उद्‌घाटन केल्यानंतर शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, आमदार नागो गाणार आणि अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व प्रयोगांच्या स्टॉल्सला भेट दिली. कुतुहलाने त्यांनी सर्व प्रयोगांविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शाबासकी देत त्यांच्यातील कुशाग्र बुद्धीचे कौतुक केले. ‘यंग सायन्स फेस्टिव्हल’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विज्ञान विश्व अनुभवले.

पुढे बोलताना शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे म्हणाले, आपले दैनंदिन जीवन विज्ञानामुळेच सुलभ झाले आहे. अनुभूतीतून हसत खेळत विज्ञानाशी मैत्री करून आपल्या संकल्पनांना मूर्तरूप द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांची विज्ञानामध्ये रुची वाढावी, त्यांची विज्ञानाशी मैत्री व्‍हावी व हसत खेळत विज्ञानाची अनुभूती घेता यावी यासाठी ‘यंग सायन्स फेस्टिव्हल’ पथदर्शी ठरावा, अशी अपेक्षा आमदार नागो गाणार यांनी यावेळी व्यक्त केली. प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभागाद्वारे विज्ञान शिकण्यासाठी विज्ञान मेळाव्यांची मदत होते. विज्ञान मेळाव्यांमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा वृद्धींगत होतात, असेही ते म्हणाले.

‘यंग सायन्स फेस्टिव्हल’मध्ये मनपाच्या शाळांसह शहरातील ४५ माध्यमिक शाळांनी सहभागी होत १५०च्या वर प्रयोग साकारले आहेत.

मनपाच्या विद्यार्थ्यांनी साकारले महापौर निवास
‘यंग सायन्स फेस्टिव्हल’मध्ये मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘ऑरेंज सिटी स्मार्ट हाउस’ प्रकल्पांतर्गत महापौर निवासाचे मॉडेल तयार केले. शहर स्मार्ट होताना शहराच्या प्रथम नागरिकांच्या ‘स्मार्ट होम’ची संकल्पना प्रयोगात मांडली आहे. संपूर्ण सौर उर्जेवरील या घरामध्ये ‘ऑटोमेटीक वॉटर सप्लाय इरीगेशन सिस्टीम’ आहे. या प्रणालीमुळे वेळ आणि पाण्याची बचत होते. ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी डस्ट बिन अलार्मची सुविधा आहे. ‘स्मार्ट गॅरेज विथ रोप’मुळे पाउस आल्यास बाहेर वाळत असलेले कपडे आपोआप आत जातील व उन निघाल्यानंतर बाहेर येतात.

जैविक खत निर्मिती करून त्यामधून महापौर निवासात हर्बल गार्डन फुलविण्यात येणार आहे. सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या आशिष पटेल, काजल शर्मा,शिवांशू पांडे, फरहत अंसारी या विद्यार्थ्यांनी शिक्षिका छाया कौरसे, दिप्ती ब्रिस्ट यांच्या मार्गदर्शनात हे मॉडेल तयार केले आहे.

याशिवाय दुर्गानगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानासह गणिताचेही प्रयोग तयार केले आहे. पायथागोरसचे प्रमेय, चौकोनाचे प्रकार, वर्तुळावर आधारित प्रमेय मॉडेल्सच्या माध्यमातून सुलभरित्या विद्यार्थ्यांना समजून दिले जात आहेत. याशिवाय गार्बेज कटर, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी स्मार्ट फार्मिंग, ऑईल रिमोव्हींग मशीन, मानवी हृदय, वाटर लेव्हल इंडिकेटर अशा विविध प्रयोगांचे मॉडेल विद्यार्थ्यांनी साकारले आहे.