Published On : Thu, Apr 29th, 2021

नागरिकांचा जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य : ना. नितीन गडकरी

महाराष्ट्र शासन, मनपा व स्पाइस हेल्थच्या मोबाईल आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण

नागपूर : देशावर आलेले कोरोनाचे संकट हे अनपेक्षित आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सर्वच जण आपापल्या परीने लढत आहेत. प्रत्येक जण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदतीसाठी पुढे येत आहे. स्पाइस हेल्थने महाराष्ट्रासाठी पहिली मोबाईल आर टी पी सी आर चाचणी प्रयोगशाळा नागपूरसाठी देऊन सहकार्याचे हात पुढे केले त्यामुळे आता सुमारे तीन हजार चाचणी अहवाल २४ तासात रुग्णांना देता येईल आणि पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार घेता येईल. नागरिकांचे प्राण वाचविणे याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन व सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्यांनी सांगितले की, नागपूर शहरासोबतच पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपुर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नमुन्यांची चाचणीसुद्धा येथील प्रयोगशाळेत होणार आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल १२ तासात उपलब्ध करण्याचे सुध्दा प्रयत्न आहेत.

स्पाइस जेटचे अध्यक्ष अजय सिंग यांनी स्पाइस हेल्थच्या माध्यमातून नागपूरला मोबाईल आर टी पी सी आर चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध करुन दिली. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह परिसरात एका छोटेखानी कार्यक्रमात त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राची ही पहिली मोबाईल चाचणी प्रयोगशाळा असून महाराष्ट्र शासन, मनपा व स्पाईस हेल्थचा हा संयुक्त उपक्रम आहे.


अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. राज्य विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गिरीश व्यास, माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, आरोग्य समिती सभापती महेश महाजन, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, नगरसेविका उषा पॅलट, शीतल कामडी, सहायक आयुक्त सुषमा मांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्पाइस जेटचे उपाध्यक्ष कर्नल कपील मेहरा, स्पाइस हेल्थचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुशांत मदहाब आणि त्यांची संपूर्ण चमू उपस्थित होती.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या संकटाच्या काळात अनेक जण पुढे येत आहेत. यात स्पाइस जेटने ऑक्सिजन सिलिंडर, बायपॅप आदी अत्यावश्यक उपकरणांची मदत केली. ही सर्व प्रक्रिया महापौर व मनपा आयुक्तांनी वेगाने पूर्ण केल्याबद्दल त्यांचे ना. गडकरी यांनी आभार मानले. तर परिस्थिती बघून वेगाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत असलेल्या महापौर दयाशंकर तिवारी यांचाही आपल्या भाषणातून गौरवोल्लेख केला. तसेच त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कामगार इत्यादींचे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरीबददल त्यांचे आभार मानले.

आता व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर, विदर्भातील अन्य जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तालुकास्तरावरही या सुविधा पोहोचाव्या, असा आपला प्रयत्न असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी सांगितले. रेमडेसिविर उत्पादनासाठी वर्धेतील एका कंपनीला परवानगी प्राप्त झाली असून तीन दिवसांत उत्पादन सुरू होईल आणि पुढील १० दिवसानंतर वैदर्भीयांना मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होतील, असेही हे म्हणाले. संकट समयी नागपूर शहराला स्वखर्चातून ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या प्यारे खान यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नागपूर शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता २०० वेटीलेंटर आले असून लवकरच ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा येणार असून या सर्वांचे वितरण ग्रामीण विदर्भात होणार आहे. यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अ‍से गडकरींनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, कार्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटीच्या (सीएसआर) अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ऑक्सिजन प्रकल्पासाठी १५ कोटी रुपये देण्याचा अंतिम प्रस्ताव तयार झालेला आहे तसेच इतर ५ हॉस्पिटलला सुद्धा सीएसआर मधून हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प करण्यासाठी निधी देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मेडिकल ऑक्सिजनची २०० टन प्रति दिवस वाहतूक होईल याची जबाबदारी नागपूरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्यारे खान यांच्या कंपनीला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ऑक्सिजन वाहतुकीसाठी विदेशातून क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करण्याचे प्रस्तावित असून ३,००० सिलेंडर खरेदी करून ते विदर्भात वितरित करण्यात येतील, अशी माहिती सुद्धा गडकरी यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपुरात कोरोनाच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. रेमडेसिविरचा पुरवठा असो, ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर असो अथवा बायपॅप सारखे उपकरणे असोत हळूहळू आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सोयी बळकट करण्याचे कार्य सुरू आहेत. याच शृंखलेत नागरिकांना चाचणीचे अहवाल लवकर प्राप्त व्हावेत या हेतूने मोबाईल आर टी पी सी आर चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे आता तीन हजार चाचण्यांचे अहवाल २४ तासांच्या आत प्राप्त होतील. इतकेच नव्हे तर काही नमुने स्पाइस जेटच्या माध्यमातून एअरलिफ्ट करून दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील, त्याचेही अहवाल २४ तासात प्राप्त होतील. विशेष म्हणजे या लॅब मध्ये होणा-या चाचणीचे सर्व अहवाल मोबाईलवर प्राप्त होणार असून यासाठी नागरिकांना चाचणी केंद्रावर जाण्याची गरज नाही. अहवाल उशीरा प्राप्त होण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत होते त्याला आता आळा बसेल. वेळेत उपचार झाल्याने अप्रत्यक्षरीत्या मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासन चाचणीचा खर्च देणार आहे.

स्पाइस जेटचे अध्यक्ष अजय सिंग हे आभासी प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या संकटाच्या काळात ना. नितीन गडकरी यांनी नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. भविष्यात जनसेवेच्या कुठल्याही कार्यात स्पाइस जेट परिवार सदैव तत्पर असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. त्यांची सुपुत्री स्पाईस हेल्थच्या सी.ई.ओ.अवनी सिंह त्यांच्या सोबत होती.

तत्पूर्वी ना. नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महापौर दयाशंकर तिवारी यांनी फीत कापून स्पाइस हेल्थ मोबाईल प्रयोगशाळेचे लोकार्पण केले. प्रयोगशाळेची पाहणी करून त्यांनी माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे संचालन सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केले तर आभार उपमहापौर मनीषा धावडे यांनी मानले.