Published On : Mon, Jun 10th, 2019

सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे पदारुढ

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनच्या नवनिर्वाचित सभापती अभिरूची राजगिरे यांनी सोमवारी (ता.१०) पदभार स्वीकारला. सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे यांनी झोन कार्यालयाच्या परिसरात आयोजित पदग्रहण समारंभात झोन सभापती म्हणून सुत्रे हाती घेतली

सतरंजीपुरा झोन कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सतरंजीपुरा झोनच्या नवनिर्वाचित सभापती अभिरुची राजगिरे, मावळत्या सभापती यशश्री नंदनवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण भिसीकर, नगरसेवक सर्वश्री महेश महाजन, संजय चावरे, नितीन साठवणे, नगरसेविका मनिषा अतकरे, निरंजना पाटील, वैशाली रोहणकर, सरिता कावरे, मनिषा धावडे, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, माजी नगरसेवक सर्वश्री प्रा. प्रमोद पेंडके, रवींद्र डोळस, राजु हातीठेले, भाजपा उत्तर नागपूर अध्यक्ष दिलीप गौर, भाजपा मध्य नागपूर अध्यक्ष विलास त्रिवेदी, शहर मंत्री हर्षीत घाटोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मावळत्या सभापती यशश्री नंदनवार यांच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन करून नवनिर्वाचित सभापती अभिरूची राजगिरे यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, सतरंजीपुरा झोन हे नेहमीच आव्हानात्मक झोन राहिले आहे. मात्र नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्धतेचे धोरण स्वीकारून सभापतींनी कामकाज करावे. नागरिकांच्या तक्रारी, त्यांच्या समस्या या झोनस्तरावर सोडविण्यात याव्यात यासाठी महानगरपालिकेत झोन सभापती पदाची निर्मिती करण्यात आली आहे. या पदावरुन प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करा, असेही आमदार कृष्णा खोपडे यावेळी म्हणाले. नागरिकांच्या समस्यांसह पर्यावरण संतुलनाकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वृक्ष लागवडीच्या संकल्पाला सर्वांनी साथ देत त्याची सुरूवात झोनपासूनच करावी व यासाठी झोन परिसरात झाडे लावून त्याचे योग्य संगोपन करा, असे आवाहनही आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

प्रत्येक प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिक, नगरसेवक व प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून काम करणे ही झोन सभापतीची जबाबदारी आहे. मात्र यासाठी कोणताही भेदभाव न ठेवता जनहितासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन आमदार विकास कुंभारे यांनी केले. काही दिवसांमध्येच पावसाळा सुरू होत असला तरी शहरात भेडसावणा-या पाणी टंचाईमुळे प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळावा व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

नवनिर्वाचित झोन सभापती अभिरूची राजगिरे म्हणाल्या, एक नगरसेविका ते झोन सभापती हा प्रवास केवळ जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल. झोनमध्ये तीन प्रभागात तीन आमदार लाभले आहेत. त्यांचे नेहमीच सहकार्य असतेच. मात्र याशिवाय झोन व मनपामधील ज्येष्ठ पदाधिका-यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनानेच जनहिताचे कार्य केले जातील, असे त्या म्हणाल्या.

मावळत्या सभापती यशश्री नंदनवार यांनी त्यांच्या कार्यकाळात झोनमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून चांगले सहकार्य लाभल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आवर्जुन सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन भाजपा पूर्व नागपूर मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक महेंद्र राउत यांनी केले तर आभार सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी मानले. यावेळी झोनच्या तीनही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.