Published On : Mon, Jan 15th, 2018

पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह

Advertisement

मुंबई: सर्वपक्षीय आणि सामाजिक धुरिणांनी संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा लाँग मार्च निघणार असून शरद पवार, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल यासारखे नेते सहभागी होणार आहेत.

26 जानेवारीला मुंबईत मंत्रालयाजवळच्या आंबेडकर पुतळ्यापासून गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून हा संविधान बचाव मार्च निघणार आहे.

खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयूचे माजी नेते शरद यादव, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल, काँग्रेसचे गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणारे गणेश देवी यामध्ये सहभागी होणार आहेत.

26 जानेवारीला मंत्रालय ते गेट वे मार्च पूर्ण झाल्यानंतर 2 तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राज्यातील काँग्रेस नेते सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.