
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) ला एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुढील दोन महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली आहे.
स्वतः राऊत यांनी एक पत्र जारी करून ही माहिती दिली असून, त्यात त्यांनी आपल्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाल्याचे नमूद केले आहे. “आपल्या सर्वांच्या प्रेम आणि विश्वासामुळे मी नेहमीच उभा राहिलो. पण सध्या माझ्या आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत सहभागी होणे टाळण्याचे सांगण्यात आले आहे. उपचार सुरू आहेत आणि मी लवकरच पूर्णपणे बरा होईन,” असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
राऊत पुढे लिहितात, “मी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा आपल्या भेटीस येईन. तोपर्यंत आपलं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या.” या पत्राच्या शेवटी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, राऊत यांनी नेमका कोणता आजार झाला आहे, याबाबत स्पष्टपणे काहीही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर राऊत दोन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून दूर जाणार असल्याने शिवसेना ठाकरे गटासाठी ही धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. राऊत हे विरोधकांवर प्रखर शब्दात टीका करणारे आणि ठाकरे गटाचे सर्वात प्रभावी चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम निवडणुकीच्या रणनीती आणि प्रचार मोहिमेवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून, उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








