Published On : Thu, Sep 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात डीजेसह लेझर लाईटवर कायमस्वरूपी बंदीसाठी जनचळवळ; संदीप जोशी यांचे आवाहन

Advertisement

नागपुरात डीजेसह लेझर लाईटवर कायमस्वरूपी बंदीसाठी जनचळवळ; संदीप जोशी यांचे आवाहन

नागपूर : उत्सव कोणताही असो, आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आनंदाच्या नावाखाली होणारे कर्णकर्कश ध्वनिप्रदूषण आणि अतितीव्र लेझर लाईटचा अतिरेक थांबविण्याची गरज आहे. नागपुरात डीजे आणि लेझर लाईटवर कायमस्वरूपी बंदी आणण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या जनचळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाइन याचिकेद्वारे नागरिकांचा सहभाग नोंदविण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या याचिकेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले. लोकभावनेचा आदर करत या चळवळीचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, डीजे आणि लेझर लाईटवरील कायमस्वरूपी बंदीसाठी पुढील काळातही सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही चळवळ कोणत्याही धर्माच्या, समाजाच्या किंवा उत्सवाच्या विरोधात नसल्याचे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले. सर्वधर्मीय सण-उत्सव, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम, मोठे कार्यक्रम तसेच निवडणूक मिरवणुकांमध्ये आनंद व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या आनंदासाठी इतर नागरिकांच्या आरोग्याशी आणि शांततेशी तडजोड करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

‘उत्सवाचा आनंद हवा, कर्णकर्कश आवाज नको’-
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यमान ध्वनिप्रदूषण नियमांची कठोर आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करावी, तसेच डीजेच्या वापरावर कायमस्वरूपी बंदीसाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

Advertisement

अतितीव्र लेझर लाईटच्या वापराबाबतही स्पष्ट नियम आणि प्रभावी नियंत्रण असावे, अशी भूमिका या अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

जनचळवळीचे आठ टप्पे-
पहिला टप्पा – ऑनलाइन याचिका : नागरिकांचे समर्थन जाणून घेण्यासाठी ऑनलाइन याचिका सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी स्वाक्षरी करून या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरा टप्पा – प्रशासनाकडे निवेदन : नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आणि लोकसमर्थनाच्या आधारे जिल्हाधिकारी, नागपूर; नागपूर महानगरपालिका आयुक्त; पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ४ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे.

तिसरा टप्पा – जनजागृती मोहीम : ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत सामाजिक माध्यमे, चित्रफिती, पोस्टर आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

चौथा टप्पा – तज्ज्ञांचा सहभाग : ध्वनिप्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ, ध्वनितज्ज्ञ आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना अभियानाशी जोडण्यात येणार आहे.

पाचवा टप्पा – राजकीय नेत्यांना पत्र : नागपुरातील सर्व आमदार, नगरसेवक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन या जनचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

सहावा टप्पा – उत्सव मंडळांशी संवाद : गणेश मंडळांसह विविध उत्सवांचे आयोजक, सामाजिक संस्था आणि कार्यक्रम आयोजकांशी संवाद साधून ‘उत्सव मोठा करा, आवाज नाही’ हा संदेश देण्यात येणार आहे.

सातवा टप्पा – लोकसमर्थनाचे संकलन : ऑनलाइन याचिकेसोबतच नागरिकांचे प्रत्यक्ष समर्थन, सूचना आणि अनुभव संकलित करून या अभियानाला व्यापक लोकआंदोलनाचे स्वरूप देण्यात येणार आहे.

आठवा टप्पा – सातत्यपूर्ण पाठपुरावा : ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी तसेच डीजे आणि लेझर लाईटवर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.

या जनचळवळीला इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूरसह विविध क्षेत्रातील डॉक्टर, सामाजिक प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, करदाते आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधींचे समर्थन मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या अभियानात माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी, आयएमए महाराष्ट्रच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. सचिन गाठे, विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंह रेणू, डॉ. अजय देशपांडे, भंते प्रज्ञानंदजी महाथेरो, विवेक रानडे, डॉ. गोपाल अरोरा, ज्येष्ठ नागरिक परिषदेचे सचिव सुरेश रेवतकर आणि क्रीडा प्रतिनिधी अशफाक शेख आदी सहभागी आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.