Published On : Thu, Jul 22nd, 2021
By Nagpur Today Nagpur News

पालकत्व हिरावलेल्या मुलींच्या लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी ‘सोबत’ची : संदीप जोशी

Advertisement

– विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त १८० कुटुबांच्या आरोग्य तपासणीसह हेल्थ कार्डचे वितरण

नागपूर : कोरोनाच्या महारामारीमध्ये दुर्दैवाने अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. या उध्वस्त कुटुंबाना आधार देत त्यांना नव्या उभारीने उभे करण्याची जबाबदारी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाने घेतली आहे. याच जबाबदारीच्या भावनेतून ‘सोबत’कडे नोंदणी असलेल्या पालकत्व हरविलेल्या कुटुंबातील मुलींच्या लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी आता ‘सोबत‘ची असून ती सर्व जबाबदारी पार पाडली जाईल, अशी ग्वाही माजी महापौर तथा ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूवारी (ता.२२) माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी हिंगणाद्वारे ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाच्या माध्यमातून १८० कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून त्यांना हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. उत्तर अंबाझरी मार्गावरील बी.आर.मुंडले सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ.प्रबोध सर व श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी हिंगणाचे उपाध्यक्ष पराग सराफ उपस्थित होते.

पुढे बोलताना ‘सोबत’चे अध्यक्ष संदीप जोशी म्हणाले, ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोबत’कडे नोंदणी झालेल्या पहिल्या १०० कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्या या सामाजिक दायित्वाची प्रतिपूर्ती म्हणून त्यांच्याच जन्मदिनी ‘सोबत’च्या जबाबदारीला अधिक दृढ करण्यात येत आहे. आपल्या भगिनी आणि त्यांच्या कुटुंबांना त्यांचा हक्काचा खंबीर आधार देण्यासाठी मोठे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

मध्यप्रदेशातील रिवा येथील मुळचे रहिवासी असलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एका भगिनीला चिमुकल्या बाळाला दुधाचा डबा विकत घेउन देण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यातून केलेली मदत ही ‘सोबत पालकत्व’चे मुळ आहे. कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या घरांमधील व्यक्तींना, भगिनींना, चिमुकल्यांना असा संघर्ष करावा लागू नये, यासाठी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाने या सर्वांची जबाबदारी उचलली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ४० मुलांचे शाळा प्रवेश व शाळेचे शुल्क भरले. पुढे दहावी व बारावीचे कोचिंग क्लासेसची व्यवस्था सुद्धा करून देण्यात येणार आहे. कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्याने संसाराला पुन्हा उभारी देण्यासाठी भगिनींना सक्षम करण्यासाठी सुद्धा ‘सोबत पालकत्व’ प्रयत्न करीत आहे. काहींना नोकरी मिळवून दिली तर अनेकांसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कुणीही खचून न जाता हिंमतीने आलेल्या परिस्थितीचा सामना करावा. येणारी प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी ‘सोबत’ प्रकल्पाशी जुळलेली प्रत्येक व्यक्ती आपला बंधू म्हणून आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे धिर सोडू नका, थोडी सहनशीलता ठेवा, प्रत्येक भगिनीला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नरत आहोत, असा विश्वास संदीप जोशी यांनी यावेळी दिला.

‘सोबत पालकत्व’कडे नोंदणी झालेल्यांमध्ये शून्य ते ५ वर्षे वयोगटातील ७३ मुले, ५ ते १० वर्षे वयोगटातील ९६ मुले, १० ते १५ वर्षे वयोगटातील १२६ मुले आणि १५ ते २० वर्षे वयोगटातील ८८ मुले अशी एकूण ३१२ मुले आहेत. या सर्वांचे पालकत्व सोबतने स्वीकारले आहे. ३१२ मध्ये मुलींची संख्या २०० एवढी असून या सर्व मुलींच्या लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी ‘सोबत’च्या माध्यमातून स्वीकारण्याची घोषणा संदीप जोशी यांनी केली आहे.

आपल्यासाठी ‘सोबत’आहे ही भावना मानसिक बळकटी देणारी : डॉ.प्रबोध
कोरोनाच्या संकटात आपली माणसे हिरावणे यासारखा दुसरा दु:ख नाही. अशा दु:खद प्रसंगी माणूस मनातून पूर्णत: खचून जातो. मात्र आपल्याला नव्या उभारीने सर्व सुरळीतपणे सुरू करायचे असेल तर मनातून खंबीर होणे आवश्यक आहे. माझे कुणीच नाही, ही भावना मनाला कमजोर करते तर माझे कुणीतरी आहे ही भावना मनाला सशक्त करते. आजच्या या संकटात ‘सोबत पालकत्व’ प्रकल्प जे कार्य करीत आहे. ते प्रत्येकाला आधार देणारे आहे. अशा स्थितीत आपल्यासाठी कुणीतरी नव्हे तर आपल्या हक्काची ‘सोबत’ आहे, ही भावना मानसिक बळकटी देणारी आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.प्रबोध सर यांनी केले.

आपल्याला भूतकाळ बदलविता येणार नाही. मात्र आपला भविष्यकाळ आपण आपल्या आजच्या वर्तमानातील निर्णयामुळे उत्तम करू शकतो. त्यामुळे आजपासून जीवनात सकारात्मकता आणा. नवा विश्वास आणि नव्या उमेदीने कामाला लागा. आपल्या संकल्पना, कल्पना आपल्या कार्याला बळ देण्यासाठी आता आपल्याकडे ‘सोबत’ नावाचे आपले हक्काचे माणसे आहेत. मात्र कुणावरही निर्भर राहू नका, स्वयंसक्षमीकरणासाठी खंबीर व्हा. एकमेकांना आधार देत एकमेकांची ‘सोबत’ व्हा, असा मोलाचा सल्ला यावेळी डॉ. प्रबोध सर यांनी दिला.

वृशाली उके यांना ई-रिक्षा प्रदान
स्वत:च्या पायावर उभे होउन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी वृशाली उके या भगिनीने ई-रिक्षा चालवून सक्षमेची मनीषा व्यक्त केली. त्यांच्या मदतीसाठी ‘सोबत’ने १ लख ४० हजार रुपये किंमतीच्या ई-रिक्षाची चावी त्यांना सुपूर्द केली. आपल्या भावना व्यक्त करताना वृशाली उके यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

याशिवाय आई वडील दोघांचेही छत्र हरविलेली जाई मोहरीर ही भावासोबत राहते. वडीलांनी मुलीचे सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करून दिले. मात्र काळाने घाला घालित वडील हिरावले. सिम्बॉयसिसचे चार वर्षाचे शिक्षण पूर्ण कसे करावे, अडीच लाख रुपये प्रवेश शुल्क वस्तीगृहाचे लाखभर शुल्क कसे भरायचे ही चिंता थेट जाईच्या शिक्षणावर उठली. अशा स्थितीत ‘सोबत’च्या माध्यमातून संदीप जोशी यांनी ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आणून दिली. देवेंद्र फडणवीस यांनी जाई मोहरीरच्या सिम्बॉयसीसमधील शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारण्याचे जाहिर केले आहे. ‘सोबत पालकत्व’ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोठा आधार मिळाला असून शिक्षण पूर्ण करून वडीलांचे स्वप्न पूर्ण करू शकणार असल्याची भावना जाई मोहरीरने व्यक्त केली.

नेहा मेश्राम, यशश्री पोखरे या दोन्ही मुलींना ‘सोबत’तर्फे सायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरण्यासाठी धनादेशही वितरीत करण्यात आले.

हेल्थ कार्डद्वारे २१ वर्षापर्यंत नि:शुल्क आरोग्य सुविधा
कार्यक्रमात नोंदणीकृत सर्व कुटुंबांना हेल्थ कार्ड प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी डॉ.सीमा दंदे व डॉ. सुषमा देशमुख यांच्या चमूद्वारे सर्व कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हेल्थ कार्डद्वारे २१ वर्षापर्यंतच्या सर्वांना नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहेत. तीन वर्षासाठी हे हेल्थ कार्ड असून त्यानंतर त्याचे नूतनीकरण करावे लागणार आहे.

यावेळी वृशाली उके, मयुरी रहांगडाले, जाई मोहरीर, संगीता साहु, अपर्णा मुठा या भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.