Published On : Thu, Jul 19th, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अवमानकारक वक्तव्य करणा-या संभाजी भिडेला तात्काळ अटक कराः डॉ. राजू वाघमारे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राज्यघटनेबाबत अवमानकारक वक्तव्य करणा-या संभाजी भिडे विरोधात मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून भिडेंना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करित आहेत. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ होता असे विधान करून भिडेनी संताचा अवमान केला आहे.

वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून भिडे समाजात तेढ निर्माण करित आहेत. दि. १६ जुलै २०१८ रोजी न्यूज १८ लोकमत या वाहिनीवरील मुलाखतीत संभाजी भिडे यांनी असत्य व वादग्रस्त विधाने करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अवमान केला आहे त्यामुळे भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली आहे.