Published On : Sat, Apr 14th, 2018

संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

नागपूर: संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज आपला देश प्रगतीकडे जात आहे त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे. यासाठी प्रत्येक भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज दुबे, रामभाऊ आंबुलकर, सुनिल मित्रा, मुरली नागपुरे, अविनाश धनगये, गोपाल बनकर, चंद्रशेखर डोर्लीकर आदी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित राज्याची रचना व वाटचाल सुरु राहील. संविधानरुपी दिलेल्या प्रगती पथावरुन राज्याची प्रगती सुरु राहील, असा संकल्प करुन त्यांनी देशवासियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.