Published On : Mon, May 13th, 2019

सुमधूर गाण्यातून ‘आई’ला सलाम…!

Advertisement

मातृदिनानिमित्त मनपा, आई फाऊंडेशन आणि हार्ट बीट्सचे आयोजन

नागपूर: जागतिक मातृदिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, आई फाऊंडेशन आणि हार्ट बीट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी हिंदी सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम रविवारी (ता.१२) डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, संयोजक प्रशांत सहारे, विजय जेथे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात प्रशांत सहारे आणि संजीवनी बुटी यांच्या ‘विठू माऊली’ या गाण्याने झाली. त्यानंतर ‘माय भवानी तुझे लेकरू…’ हे गीत संजीवनी यांनी गायले. ‘तु कितनी अच्छी है’, ‘ए माँ तेरी सुरत से अलग…’, ‘बडा नटखट है’, ‘भय इथले संपत नाही’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘आ री आ निंदिया’, ‘ती गेली तेव्हा पाऊस रिमझीम होता’ यासारख्या सुमधूर गाण्यांनी ररिकांना मंत्रमुग्ध केले. प्रशांत सहारे आणि संजीवनी बुटी यांच्या समवेत प्रशांत वाळीलकर, नितीन झाडे, प्रतीक जैन, प्राची सहारे, अनुष्का काळे, सुनिता कांबळे, सानवी अनिल तेलंग यांच्या बहारदार गाण्यांनी रसिकांना मोहिनी घातली. संगीत नियोजन प्रशांत नागमोते यांचे होते. निवेदन नम्रता अग्निहोत्री यांनी केले.

कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रमामध्ये महापौर नंदा जिचकार आणि रामभाऊ इंगोले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला साथसंगत करणाऱ्या कलावंताचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.