Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Apr 25th, 2018

  राज्य विकासात विक्रीकर विभागाचा मोलाचा वाटा; राज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ – सुधीर मुनगंटीवार

  मुंबई : विक्रीकर विभाग हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग असून १९६० च्या राज्य स्थापनेच्या पहिल्या वर्षीच्या ३० कोटी रुपयांच्या कर महसुलात आता यावर्षी १ लाख १५ हजार ९४० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ ३८६५ पट आहे, ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे आणि हे या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामाचे फलित आहे असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले

  आज वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते महाजीएसटी संकेतस्थळ, ऑनलाईन निर्धारणा, महाजीएसटी मोबाईल ॲप, महापीटी मोबाईल ॲप या विविध संगणकीय सुविधांचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

  वस्तू आणि सेवा कर विभागाच्या ऑटोमेशनमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 60 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. वस्तू आणि सेवा कर प्रणालीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल वस्तू आणि सेवा कर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा यांचा नुकताच प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आज श्री. मुनगंटीवार यांनीही श्री. जलोटा यांचा गौरव करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

  घरात आईचे महत्त्‍व हे इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा वेगळे आणि अनन्यसाधारण असते. त्याप्रमाणेच शासनाच्या सर्व विभागांमध्ये वस्तू आणि सेवा कर विभागाचे महत्त्व हे वेगळे आहे कारण राज्य विकासासाठी आवश्यक असलेला कर महसूल सर्वाधिक प्रमाणात हा विभाग मिळवून देतो. त्यामुळे सर्व विभागांमध्ये मातृस्थानी असलेल्या वस्तू आणि सेवा कर विभागाचे काम अभिनंदनीय असल्याचे सांगून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे यासाठी कौतुक केले. विभागाने एक परिवार होऊन वस्तू आणि सेवा कर प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करताना कर महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले. आज त्यांच्या कामाचा गौरव केल्याने त्यांना एक नवी शक्ती मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  जो विभाग राज्याच्या तिजोरीत पैसा देतो त्या विभागांचे जसे वस्तू आणि सेवा कर विभाग, मुद्रांक शुल्क विभाग, कोषागारे यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या श्रमातून राज्य विकासात कर रूपाने योगदान देणाऱ्या राज्यातील व्यापारी, उद्योजक आणि करदात्यांना सहज, सुलभ आणि सरल संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे. करदात्याला कोणत्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये, त्याला नियमाप्रमाणे सहज सुलभ पद्धतीने कर भरता यावा, यासाठी एक उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विभागावर आहे. विभागाचे अधिकारी-कर्मचारी अतिशय समर्पितपणे त्यासाठी काम करत आहेत. म्हणूनच दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर संकलन करण्यात विभाग यशस्वी झाला आहे. अर्थमंत्री म्हणून मला त्याचा निश्चित आनंद वाटतो, अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. यापुढेही भविष्यात लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे उत्तमातील उत्तम काम करा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

  यावेळी आयुक्त राजीव जलोटा यांनी विभागाचे संगणकीकरण आणि त्या माध्यमातून करदात्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधा यांची माहिती दिली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145