नागपूर : साडेतीन वर्षांपूर्वी बांधलेला बुटीबोरी उड्डाणपुलाला तडे गेल्याची घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने यांची गंभीर दखल घेतली.
तसेच याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. नागपुरातील सर्व पुलांचे सेफ्टी ऑडिट होणार आहे. मीट द प्रेस कार्यक्रमात फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली.
बुटीबोरी उड्डाणपुलाला तडे गेल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पुलासह इतर पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना NHAI आणि PWD यांना दिल्या जातील.
मंगळवारी सकाळी पुलाचे प्रत्येकी तीस मीटरचे दोन स्पॅन कोसळले. बराचसा ढिगारा खाली पडताना दिसत होता. पुलाखालून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर तुकडे पडले. त्यानंतर हा पूल बंद करण्यात आला. त्यामुळे बुटीबोरी टी-पॉइंटवर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.