मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याचदरम्यान जागावाटपासंदर्भात सर्व मित्र पक्षांनी बैठकांचा धडका लावला आहे.यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. अजित पवारांनीही अशीच भूमिका घेतली. पण आता त्यांना लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागत आहेत. डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे. आम्ही स्वाभिमानाने २३ जागा लढत होतो आणि २३ जागा लढत राहू. पण जी डुप्लिकेट शिवसेना आहे, त्यांच्या वाट्याला पाच जागाही येत नाहीत. कुत्र्यापुढे हाडूक फेकावे, अशा पाच जागा दिल्या आहेत. अजित पवारांची तर दोन-तीन जागांवर बोळवण केल्याचे दिसत आहे, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. लोढा यांच्याहस्ते शिवसेना शाखेचे उदघाटन करावे लागते, इतके वाईट दिवस शिवसेनेवर कधीही आले नव्हते. ज्या बिल्डरांनी त्यांच्या गृहसंकुलात मराठी माणसांना घुसण्याची परवानगी दिली नाही, त्या बिल्डरांकडून फक्त डुप्लिकेट शिवेसेनेच्या शाखेचे उदघाटन होऊ शकते, स्वाभिमानी शिवसेनेचे नाही, असेही राऊत म्हणाले.
अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचे आरोप भाजपाने केले होते, त्या आरोपांचे काय झालं? अजित पवारांचे सर्व आरोप भाजपाबरोबर गेल्यामुळं धुतले गेले काय? जे स्वाभिमान लोक तुमच्याविरोधात लढत आहेत, त्यांना त्रास देऊन तुम्ही लोकसभा निवडणूक जिंकू पाहत आहात. पण संजय राऊत असो की रोहित पवार असो, स्वतः शरद पवार असतील. आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाहीत. आम्ही लढू आणि एक दिवस येईल की, त्यांनाच आमच्यासमोर गुडघे टेकावे लागतील, असेही ठामपणे राऊत म्हणाले.