Published On : Mon, Nov 2nd, 2020

विद्यापीठाच्या कोविड -१९ निदान केंद्राने 2 महिन्यातच केल्या दहा हजार चाचण्या पूर्ण

Advertisement

नागपुर– कोरोनाचे संकट ऐन भरात असताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठात कोविड-१९ निदान केंद्र स्थापण्याचा निर्णय घेतला. प्रयोगशाळा उभारणीच्या कामातील सर्व अडथळे पार करून आय. सी. एम. आर. मान्यताप्राप्त पूर्णत: सुसज्ज अशी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.

प्रयोगशाळेचे उद्घाटन २४ ऑगस्टला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू व या प्रयोगशाळेचे प्रणेते डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्तेच पार पडले. प्रयोगशाळेने 25 ऑगस्ट रोजी पहिल्या नमुन्यांचे विश्लेषण केले. प्रयोगशाळेतील उपलब्ध सुविधा दररोज ५० नमुन्यांचे विश्लेषण करण्यापुरती मर्यादित असूनही, संपूर्ण चमूने अथक परिश्रम करून आणि सामाजिक जाणीव ठेवून स्थापनेच्या दोन महिन्यांतच दहा हजार विश्लेषणांचा टप्पा पार करण्याचे अपवादात्मक कार्य केले आहे. हे काम केंद्रातील खरे कोरोना वॉरियर्स डॉ. अमित ताकसांडे, श्रेया जाजू आणि अन्य स्वयंसेवकांच्या अपरिमित कष्टांमुळेच झाले आहे. या चमूच्या समर्पित सेवेमुळेच दररोज प्राप्त होणाऱ्या नमुन्यांचे वेगवान विश्लेषण, वेळेत अहवाल देणे आणि वास्तविक क्षमतेपेक्षा जास्त नमुने तपासणे शक्य झाले आहे. विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि फार्मसी विभागातील 15 हून अधिक विद्यार्थी स्वयंसेवक यासाठी निरलसपणे काम करीत आहेत.

प्रयोगशाळेत चाचणीकरिता जिल्हा शल्य चिकित्सक व नोडल अधिकारी-कोविड-१९, नागपूर यांच्या कार्यालयातर्फे चार तंत्रज्ञ, दोन डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांची नियुक्ती केलेली आहे. सर्व नियुक्त तंत्रज्ञ, वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि नोडल अधिकारी यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथून रीतसर प्रशिक्षण प्राप्त केलेले आहे.

कोविड चाचण्यांकरिता आवश्यक सर्वच अद्ययावत उपकरणे; जसे, बायोसेफ्टी कॅबिनेट लेवल -२ (बी.एस. एल.-२), आर.टी.पी.सी.आर. मशीन, कुलिंग सेन्त्रीफ्युज आणि इतर उपकरणे प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत. कोविड चाचणीकरिता बी.एस. एल.-२ आणि आर.टी.पी.सी.आर. मशीन अत्यंत महत्वाचे आहेत. आरटी-पीसीआर तंत्राचा वापर करून कोरोना विषाणूचे विश्लेषण आण्विक स्तरावर केले जाते.

केंद्राचे प्रत्यक्ष काम २५ ऑगस्टपासून सुरू झाले असले तरी दैनंदिन १७१ नमुन्यांच्या सरासरीने केंद्राने दोनच महिन्यांच्या अवधीत १० हजार चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत ११२०० पेक्षा जास्त नमुन्यांचे विश्लेषण केंद्राने केले आहे.

कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आणि कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे केंद्र प्रगतिपथावर आहे. प्रा.निशिकांत राऊत, डॉ. आरती शनवारे, डॉ. प्रीती कुलकर्णी (वैद्यकीय अधिकारी) आणि प्रा. एन. एन. करडे (नोडल अधिकारी) केंद्राचे तांत्रिक व प्रशासकीय व्यवस्थापन पाहत आहेत.