Published On : Sat, Jul 3rd, 2021

आरटीई : विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ठेवण्याचा नवीन फंडा- बसपाची तक्रार

Advertisement

-. मागील वर्षी कमी वय, या वर्षी जास्त वय सांगून विद्यार्थ्यांना नाकारले

नागपुर – आरटीई अंतर्गत वंचित व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु शासनाने व शाळांनी संगणमत करून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू नये यासाठी वयाचा फंडा वापरुन षड्यंत्र रचल्याची तक्रार बसपा नेते उत्तम शेवडे ह्यांच्यातर्फे करण्यात आली.

*पश्चिम नागपूर च्या सुभाष नगर परिसरातील लोखंडे नगर निवासी मनोज बागडे यांनी आपल्या अर्णव नावाच्या मुलासाठी दि 23 सप्टेंबर 2014 जन्मतारीख असलेला ऑनलाईन अर्ज भरला परंतु वय जास्त असल्याचे सांगून ऑनलाइन अर्ज नाकारण्यात आल्याची तक्रार मनोज बागडे यांची आहे*.

मागील वर्षी यांनीच अर्णव साठी ऑनलाईन अर्ज केला तेव्हा त्यांचे वय कमी पडत असल्याचा रिमार्क देण्यात आला, म्हणजे मागील वर्षी कमी वय असल्याने त्याला पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात आला नाही. यावर्षी जास्त वय झाल्याचे सांगून त्याचा अर्ज नाकारुन त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र शासन आणि शाळांनी रचले असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे कार्यालयीन सचिव ऊत्तम शेवडे यांनी केली आहे.

खरेतर अनेक शाळा 25% वंचित (मागासवर्गीय) व गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू नये या मताच्या आहेत. वेळोवेळी गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अडविण्यासाठी शासनाने सुद्धा अनेक शाळांचे वंचित व गरीब विद्यार्थ्यांचा करोडो रुपयांचा फंड शाळेच्या स्वाधीन केला नाही. हा बहाना शाळेतर्फे दरवर्षी सांगितला जातो. या वर्षी अनेक जागा खाली असूनही त्या भरल्या जात नाही.

मनोज बागडे हे अनुसूचित जातीतील गरीब असून खाजगी वाहन चालविण्याचे काम करुन परिवाराची उपजीविका चालवितात. यांच्या निवासी परिसरात त्रिमूर्ति नगरात भवन्स ची ब्रँच असून तिथे त्यांची मुलगी शिक्षण घेत आहे. परंतु मुलांच्या प्रवेशासाठी जेव्हा मनोज बागडे यांनी अर्ज केला तर त्यांचा ऑनलाईन अर्जच नाकारण्यात आल्याची तक्रार त्यांनी आरटीई अधिकारी यांच्याकडे केली असे समजते.

नागपूर चे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे मी स्वतः 1 महिनेपूर्वी कळविले. नागपूर जिल्हाधिकारी यांनी मनोज बागडे यांच्या अर्णव या मुलास त्यांच्या परिसरात असलेल्या त्रिमूर्ती नगरातील भवन्स या शाळेत प्रवेश द्यावा. अशी मागणी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी ह्यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.