Published On : Tue, Oct 17th, 2017

RSS स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या


लुधियाना: पंजाबमधील लुधियाना येथे मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका स्वंयसेवकाची हत्या करण्यात आली आहे. संघाच्या शाखेवरुन घरी परतत असताना स्वंयसेवकावर हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेर गोळीबार केला. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले, त्यावरुन हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. हल्लेखोर हे बाइकवरुन आले असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधात छापेमारी सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र गोसाई हे संघाच्या शाखेवरुन परत येत होते. कैलाशनगर रोडवरील त्यांच्या घराबाहेर मोटारसायकवल आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर गोळीबार केला.
गोसाईंच्या मृत्यूची बातमी कळताच शेकडो स्वयंसेवक तथा पोलिस आयुक्त आर. एन. ढोके वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

रवींद्र गोसाईंची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली असा कुटुंबियांचा आरोप आहे. रवींद्र गोसाई यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे, की त्यांचा जमीनीचा एक वाद सुरु होता. गोसाई हे मोहन संघ शाखेचे मुख्य प्रशिक्षक होते.