Published On : Thu, Aug 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर आरएसएसचा गड नाही तर संविधानाचा गड; आयसा अध्यक्षा नेहा बोरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Advertisement

नागपूर आरएसएसचा गड नाही तर संविधानाचा गड; आयसा अध्यक्षा नेहा बोरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

नागपूर : बेरोजगारी, शिक्षणातील अनागोंदी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याच्या कथित प्रवृत्तीवरून एआयएसएच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नागपुरातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेने आता भीती झुगारून लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपुरातील आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोरा यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

“सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाकिस्तानी म्हटले जाते. आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतात, तेव्हा त्यांना ‘अर्बन नक्षलवादी’ ठरवले जाते. पण आता देशातील विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत. त्यांचा आवाज दाबता येणार नाही,” असा घणाघात बोरा यांनी केला.

सरकारने विकासाचे मोठमोठे दावे केले; मात्र या विकासाचा फायदा सामान्य जनतेपेक्षा सत्ताधाऱ्यांनाच झाला, असा आरोप त्यांनी केला. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना तरुणांच्या भवितव्याबाबत सरकारकडे ठोस उत्तर नसल्याचेही त्यांनी सुनावले.

विद्यार्थी आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि विविध लोकशाही संघर्षांचा संदर्भ देत बोरा म्हणाल्या, “आमच्या मित्रांवर पडलेल्या लाठ्या, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि संघर्षात गेलेले जीव आम्ही विसरलेलो नाही. सरकारने गेल्या दशकभरात जनतेमध्ये भीती निर्माण केली; आता ही भीती झुगारून पुन्हा संघर्ष उभा करण्याची वेळ आली आहे.”

Advertisement

केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. “नागपूरला आरएसएसचा गड म्हणून ओळखले जाते; पण नागपूर हा आरएसएसचा नव्हे, तर लोकशाही आणि संविधानाचा गड आहे, हे येथील जनतेने सिद्ध केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

“महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्षाची सुरुवात नागपुरातून झाली पाहिजे. विद्यार्थी चळवळ अधिक मजबूत करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्हीही आमच्या संघर्षात सहभागी व्हा,” असे म्हणत बोरा यांनी नागपूरकरांना आंदोलनाची हाक दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बोरा यांनी दिला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.