Published On : Fri, Nov 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील पावणेचार कोटींच्या लुटीने शिवनी हवालाकांडाची पुन्हा चर्चा; सोहन परमार केंद्रस्थानी!

Advertisement

नागपुरातील पावणेचार कोटींच्या लुटीने शिवनी हवालाकांडाची पुन्हा चर्चा; सोहन परमार केंद्रस्थानी!

नागपूर : नागपूरच्या तुलसीनगर परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आलेल्या पावणेचार कोटी रुपयांच्या घटनेने आता नवे वळण घेतले आहे. या लुटीचे धागेदोरे मध्य प्रदेशातील शिवनी येथे उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या हवालाकांडाशी जोडले जात असल्याने नागपूरसह मध्य भारतातील हवाला व्यवहारांच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही घटनांमध्ये जालना येथील सोहन परमार यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

तुलसीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहणारे सुरेश परमार यांच्याकडे ही रोकड होती. प्राथमिक माहितीनुसार, ही रक्कम त्यांचे भाऊ सोहन परमार यांची असल्याचे सांगितले जात आहे. सोहन हे जालन्यात फायनान्स व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती आहे. मंगळवारी मध्यरात्री वाहनचालक मोहन राव हे कारमधून पावणेचार कोटी रुपयांची रोकड घेऊन जालन्याकडे रवाना होणार होते. मात्र, नागपुरातील तुलसीनगर परिसरातच सशस्त्र लुटारूंनी त्यांना लक्ष्य केले. चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी संपूर्ण रोकड लंपास केली. घटनेनंतर नागपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या लुटीमुळे नागपूरचे नाव पुन्हा एकदा मध्य भारतातील हवाला व्यवहारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. कारण, ऑक्टोबर २०२५ मध्ये मध्य प्रदेशातील शिवनी येथे घडलेल्या हवालाकांडातही सोहन परमार यांचे नाव समोर आले होते. ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सोहन परमार आणि त्यांचे सहकारी एमएच १३ ईके ३४३० क्रमांकाच्या क्रेटा कारमधून सुमारे २ कोटी ९६ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेऊन जात होते. नागपूरमार्गे जालन्याकडे निघालेल्या या कारला शिवनी जिल्ह्यातील बंडोल पोलिसांनी अडवले होते.

या कारवाईत कारमध्ये जवळपास तीन कोटी रुपये असताना अधिकृत जप्तीच्या नोंदीत केवळ १ कोटी ४५ लाख रुपये दाखवण्यात आल्याचा आरोप झाला होता. उर्वरित रक्कम पोलिसांनी आपसात वाटून घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मध्य प्रदेश पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. तत्कालीन एसडीओपी पूजा पांडे यांच्यासह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Advertisement

विशेष तपास पथकाच्या चौकशीत १ कोटी ४५ लाख रुपये पूजा पांडे आणि एसआय अर्पित भैरम यांच्याकडून, तर उर्वरित १ कोटी २५ लाख रुपये नागपुरातील आकाश जैन आणि अमन गुरनानी यांच्याकडून जप्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणात पूजा पांडे यांना निलंबित करून अटकही करण्यात आली होती. त्यामुळे शिवनीतील हवालाकांडात नागपूरमधील व्यक्तींच्या नावांचा समावेश झाल्याने शहरातील हवाला व्यवहारांचे जाळे चर्चेत आले होते.

आता तुलसीनगरमधील लुटीच्या प्रकरणातही सोहन परमार यांचे नाव समोर आल्याने शिवनी आणि नागपूरमधील घटनांचा परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही प्रकरणांतील रोकड वाहतुकीचे मार्ग, संबंधित व्यक्तींचे आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य दुव्यांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत नागपूर पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नागपूर हे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील हवाला व्यवहारांसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. रायपूरमधून शिवनी आणि छिंदवाडा मार्गे नागपुरात मोठ्या प्रमाणावर रोकड येत असल्याची चर्चा आहे. या मार्गाने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती स्थानिक पोलिसांना असल्याचेही बोलले जाते. मात्र, अशा व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाते का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वी नागपुरातील नंदनवन परिसरात तीन कोटी रुपयांची रोकड पकडण्यात आली होती. त्यातील दीड कोटी रुपये पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने हडपल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे नागपुरात कोट्यवधींच्या रोकड व्यवहारांशी संबंधित घटनांचा इतिहासही पुन्हा चर्चेत आला आहे.

तुलसीनगरमधील पावणेचार कोटींची लूट, शिवनीतील हवालाकांड आणि नागपुरातील कथित हवाला नेटवर्क यांच्यात नेमके कोणते संबंध आहेत, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणात लुटारूंचा शोध सुरू असून, नागपूरच्या या मोठ्या लुटीमागील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.